फक्त एका 'लॉलीपॉप'वरून राडा... चायनीज हॉटेलमध्ये ग्राहक आणि कामगारांत तुंबळ हाणामारी...

Share:
Main Image
Last updated: 25-May-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २५ मे - फक्त एक तळलेला लॉलीपॉप उचलून खाल्ल्याच्या किरकोळ कारणावरून हॉटेल कामगार आणि ग्राहकांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना द्वारका परिसरातील 'नूर चायनीज' हॉटेलमध्ये घडली. या राड्यात लोखंडी झाऱ्या आणि कढईने मारहाण करण्यात आल्याने चार ग्राहक जखमी झाले आहेत. हॉटेलमध्ये झालेल्या या तोडफोड आणि मारहाण प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूने परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नेमका काय घडला प्रकार?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हमालवाडी भागात राहणारा जॉय चंद्रकांत जाधव (अल्पवयीन) हा रविवारी (दि. २४) रात्री त्याचा मामा आशिष गुंजाळ, मावसभाऊ गौरव जाधव व आतेभाऊ अनिकेत गायकवाड यांच्यासोबत जेवण करण्यासाठी द्वारका येथील नूर चायनीज हॉटेलमध्ये गेला होता. हॉटेलमध्ये प्रवेश करत असतानाच, मामा आशिष गुंजाळ याने काउंटरवर विक्रीसाठी ठेवलेला एक तळलेला लॉलीपॉप उचलून खाल्ला.

यावरून काउंटरवरील कामगाराने "ऐसे उठाके मत खाओ, पुरा प्लेट लो" (असे उचलून खाऊ नका, पूर्ण प्लेट घ्या) असे टोकले. या किरकोळ कारणावरून दोन्ही बाजूंनी वाद पेटला आणि त्याचे रूपांतर थेट तुंबळ हाणामारीत झाले.

Advertisement

लोखंडी झाऱ्याने हल्ला; रोकड पळविल्याचा आरोप
ग्राहकाची फिर्याद: जॉय जाधव याने दिलेल्या फिर्यादीनुसार, लॉलीपॉप खाल्ल्याच्या रागातून हॉटेलमधील संशयित इरफान आझाद खान, अशफाक समद मन्सुरी आणि फैजान अन्सारी मन्सुरी यांनी अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. तसेच हॉटेलमधील लोखंडी झाऱ्या आणि गरम कढईने जबर मारहाण केली. या हल्ल्यात चारही ग्राहक जखमी झाले असून, हॉटेल चालकाने मारहाण करत खिशातील रोकड बळजबरीने काढून घेतल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे.

हॉटेलमध्ये तोडफोड आणि लुटमारीचा प्रतिआरोप
हॉटेल कामगाराची फिर्याद: दुसरीकडे, हॉटेलमधील मजूर फैजान मन्सुरी (रा. नानावली, जुने नाशिक) यानेही ग्राहकांविरोधात फिर्याद दिली आहे. संशयित आशिष गुंजाळ (२५, रा. पेठरोड) याने ट्रिपल राईसची ऑर्डर दिली होती. त्याला काउंटरवरील लॉलीपॉप उचलून खाण्यापासून रोखल्याचा राग आला. या रागातून संशयिताने हॉटेलमध्ये गोंधळ घालत शिवीगाळ व मारहाण केली. तसेच हॉटेलमध्ये तोडफोड करून दमदाटी करत कामगाराच्या खिशातील ५०० रुपयांची रोकड बळजबरीने काढून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पोलीस तपास सुरू
या घटनेमुळे द्वारका परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माळी व पोलीस उपनिरीक्षक सय्यद करत आहेत.

Comments

No comments yet.