क्रूरतेची सीमा ओलांडत ओठ अन् जीभ कापली... माजी IPS अधिकाऱ्याच्या पत्नीची घरात घुसून निर्घृण हत्या... विश्वासू मोलकरीणचे कृत्य... 

Share:
Main Image
Last updated: 24-May-2026

पुणे, (प्रतिनिधी) २४ मे - घरातील नोकरांवर ठेवलेला आंधळा विश्वास किती भयानक ठरू शकतो, याचा एक थरकाप उडवणारा प्रकार हैदराबादमध्ये समोर आला आहे. राज्याचे माजी पोलीस महासंचालक (DGP) विजय रंजन यांच्या घरात घुसून त्यांच्या पत्नी तनुजा रंजन (वय अंदाजे ५५) यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. या घटनेत घरातून तब्बल साडेतीन कोटी रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि मोठी रोकड लंपास करण्यात आली आहे. या संपूर्ण हत्याकांडाची मास्टरमाइंड रंजन कुटुंबात वर्षानुवर्षे विश्वासाने काम करणारी नेपाळी मोलकरीण कल्पना असून, हैदराबाद पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास करत तिला पुण्यातून बेड्या ठोकल्या आहेत. ही धक्कादायक घटना ८ मे २०२६ च्या मध्यरात्री घडली.

मध्यरात्री 'त्या' खोलीत नेमकं काय घडलं?
माजी डीजीपी विजय रंजन हे कामाच्या निमित्ताने बेंगलोरला गेले होते. घरात त्यांच्या पत्नी तनुजा रंजन आणि दोन मुली होत्या. ८ मे च्या मध्यरात्री सुमारे १ वाजता, रंजन कुटुंबाचा पूर्ण विश्वास संपादन केलेल्या कल्पना नावाच्या मोलकरणीने घराचे मुख्य गेट उघडून नेपाळच्या ३ अज्ञात पुरुष साथीदारांना आत घेतले. हे तिघेही सोबत हत्यारे घेऊन आले होते.
तनुजा रंजन पहिल्या मजल्यावरील खोलीत गाढ झोपल्या असताना कल्पना या तिघांना घेऊन तिथे पोहोचली. आरोपी कपाटातील वस्तूंची चोरी करत असताना अचानक तनुजा यांना जाग आली. त्यांनी आरडाओरडा करू नये म्हणून आधी त्यांचे तोंड दाबून हात-पाय बांधण्यात आले.

क्रूरतेची पराकाष्ठा; जीभ कापून गळा दाबला
तनुजा यांनी स्वतःला सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, घरमालकिणीला जिवंत सोडले तर पोलीस आपल्याला शोधून काढतील, याची जाणीव कल्पनाला होती. त्यामुळे तिने आरोपींना हत्येची खूण केली. चोरीच्या मालातील पैशांचे बंडल आणि आसपासचे कपडे तनुजा यांच्या तोंडात कोंबण्यात आले. त्यानंतर आरोपींनी क्रूरतेची सीमा ओलांडत धारदार हत्याराने तनुजा यांचे ओठ आणि जीभ कापून टाकली. एवढ्यावरच न थांबता पुन्हा तोंडात पैशांचे बंडल कोंबून गळा दाबून त्यांची हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे याच वेळी रंजन यांच्या दोन मुली वरच्या मजल्यावर झोपलेल्या होत्या.

Advertisement

सकाळी उघडकीस आला प्रकार
मध्यरात्री अडीचच्या सुमारास सर्व आरोपी बॅगा भरून पसार झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता जेव्हा दुसरी मोलकरीण कामावर आली, तेव्हा तिने बेल वाजवली. तनुजा यांच्या मुलीने दरवाजा उघडला. कल्पना घरात कुठेच दिसत नसल्याने आणि तिचा फोन स्विच ऑफ असल्याने दोघींनी तनुजा यांच्या खोलीत जाऊन पाहिले. तिथे तनुजा रंजन रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत पडलेल्या आढळल्या. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचे आणि जीभ व ओठ कापल्याचे स्पष्ट झाले.

दिल्लीच्या हायटेक 'मोलकरीण गँग'चा पर्दाफाश
विजय रंजन हे माजी मोठे पोलीस अधिकारी असल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे जलदगतीने फिरवली. तपासात समोर आले की, कल्पना ही दिल्लीतून ऑपरेट होणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय नेपाळी गँगची सक्रिय सदस्य आहे. या दिल्लीतील गँगमध्ये नेपाळी मुलींना श्रीमंत घरांमध्ये हाऊस हेल्प म्हणून कसे शिरावे, लोकांचा विश्वास कसा संपादन करावा आणि मौल्यवान वस्तू कुठे ठेवल्या जातात याची माहिती कशी काढावी, याचे रीतसर ट्रेनिंग दिले जाते. कल्पनाने नोकरीला लागताना दिलेले ओळखपत्र देखील पूर्णपणे बनावट (फेक) असल्याचे उघड झाले आहे.

मुख्य आरोपी पुण्यातून जेरबंद; चोरीच्या मालाबाबत नवा ट्विस्ट!
चोरी केल्यानंतर कल्पनाने नामपल्ली स्टेशनवरून तेलंगणा एक्सप्रेस पकडली. ती नेपाळला पळण्याच्या तयारीत होती, मात्र पोलिसांनी सर्व सीमांवर अलर्ट जारी केला होता. अखेर तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी पुण्यात धाड टाकून कल्पनाला तिच्या मावशीच्या घरून ताब्यात घेतले.

या प्रकरणात एक नवा ट्विस्ट समोर आला आहे. पोलिसांनी कल्पनाला अटक केली असली तरी साडेतीन कोटींचे दागिने आणि रोकड घेऊन तिचे तीनही पुरुष साथीदार फरार झाले आहेत. अटक झाली तेव्हा कल्पनाकडे काहीही मुद्देमाल नव्हता. साथीदारांनी तिला मुद्दाम अडकवून पैशांसह पळ काढला का? याचा तपास आता हैदराबाद आणि दिल्ली पोलीस करत आहेत.

Comments

No comments yet.