लातूर, (प्रतिनिधी) २४ मे - NEET (वैद्यकीय पात्रता परीक्षा) पेपरफुटी प्रकरणातील एक प्रमुख संशयित आरोपी आणि लातूर येथील नामांकित 'आरसीसी' (RCC) कोचिंग क्लासचा संचालक शिवराज मोटेगावकर याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. पेपरफुटीच्या चौकशीदरम्यान आता त्याचे जुने-नवे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. यातील एका ताज्या व्हिडिओमुळे मोटेगावकर हा केवळ शैक्षणिक व्यावसायिक नसून एक पक्का 'भोंदू' असल्याचा आरोप करत नेटकऱ्यांनी आणि पालकांनी त्याच्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
विज्ञान शाखेतून प्रगतीचे स्वप्न पाहणारे विद्यार्थी आणि लाखो रुपये फी भरणारे पालक अशा अंधश्रद्धाळू आणि धंदेवाईक लोकांच्या जाळ्यात कसे अडकतात, यावर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे?
सध्या सर्वत्र चर्चिल्या जाणाऱ्या या व्हिडिओमध्ये शिवराज मोटेगावकर त्याच्या क्लासमधील बाकांवर (Benches) चढलेला दिसत आहे. त्याच्या एका हातात तांब्याचे भांडे आणि दुसऱ्या हातात आंब्याची पाने आहेत. तो या पानांच्या साहाय्याने तांब्यातील पाणी वर्गात समोर बसलेल्या विद्यार्थ्यांच्या अंगावर शिंपडत आहे.
पाणी शिंपडताना तो विद्यार्थ्यांना उद्देशून अत्यंत आत्मविश्वासाने म्हणतोय, "तुमचा नंबर आता 'एम्स'ला (AIIMS) लागणार... हा योग खूप वर्षांनंतर आला आहे." असे म्हणत तो एका बाकावरून दुसऱ्या बाकावर उड्या मारत सर्व विद्यार्थ्यांवर पाणी शिंपडताना या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे.
'विज्ञान' की 'अंधश्रद्धा'? भावी डॉक्टरांच्या भवितव्याशी खेळ
'एम्स' (AIIMS) ही भारतातील वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोच्च आणि अत्यंत नामांकित संस्था आहे. येथे प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना जीवशास्त्र, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र यांसारख्या वैज्ञानिक विषयांचा अहोरात्र सखोल अभ्यास करावा लागतो. मात्र, देशाचे भावी डॉक्टर घडवण्याचा दावा करणाऱ्या एका क्लास संचालकाकडून अशा प्रकारे उघड भोंदूगिरी आणि अंधश्रद्धेचा बाजार मांडला गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. "एका बाजूला पेपर फोडण्याचे गैरप्रकार आणि दुसरीकडे अशी अंधश्रद्धा; यातून घडणारे डॉक्टर भविष्यात रुग्णांवर उपचार कसे करणार?" असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.
एकदा ॲडमिशन घेतले की... तुम्ही फक्त पैसा फेका!
मोटेगावकरसारख्यांनी वैद्यकीय शिक्षण क्षेत्राचा निव्वळ धंदा मांडल्याचे यावरून सिद्ध होते. एका बाजूला पालकांकडून लाखोंची फी उकळायची, दुसरीकडे पेपर फोडून किंवा विद्यार्थ्यांवर 'पाणी शिंपडून' आम्ही तुम्हाला डॉक्टर करणारच, असा आव आणायचा, हा सर्व प्रकार म्हणजे पालकांच्या हतबलतेचा गैरफायदा घेणारा आहे. "तुम्ही फक्त पैसा फेका, पुढचे आम्ही बघतो," अशीच ही एकूण वृत्ती असल्याचे दिसून येत आहे.
पालक आणि विद्यार्थ्यांची कीव
लाखो रुपयांचे व्यवहार आणि दुसरीकडे ही भोंदूगिरी अशा दोन्ही गैरमार्गांनी विद्यार्थ्यांना आकर्षित करून केवळ पैसा कमवणे हाच यामागचा मुख्य उद्देश असल्याचे उघड झाले आहे. या भोंदूगिरीला बळी पडणाऱ्या सुशिक्षित पालक आणि विद्यार्थ्यांची आता कीव करावी तेवढी कमीच आहे, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.
?s=20