कर्करोगाच्या अचूक निदानासाठी महाराष्ट्रात येणार हे तंत्रज्ञान...  राज्यात २७ ठिकाणी सुरू होणार...

Share:
Main Image
Last updated: 25-May-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २५ मे - "राज्यात कर्करुग्णांची (Cancer) संख्या सातत्याने वाढत आहे. या कर्करोग विरोधी लढाईत केवळ शासकीय यंत्रणेवर अवलंबून न राहता खासगी कर्करोग रुग्णालये, कर्करोग तज्ज्ञ आणि सेवाभावी संस्थांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे," असे प्रतिपादन राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. आरोग्यसेवा आयुक्तालय, मुंबई येथे आयोजित एका उच्चस्तरीय बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला टाटा, रिलायन्स, लीलावती यांसारख्या नामांकित खासगी रुग्णालयांचे प्रतिनिधी, ज्येष्ठ ऑन्कोलॉजिस्ट, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, आरोग्य सेवा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्यासह दक्षिण कोरियातील 'आयएमबी' (IMB) संस्थेचे तज्ज्ञ व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.

'अर्ली डिटेक्शन'वर भर; ३ कोटींहून अधिक नागरिकांची तपासणी
आरोग्यमंत्री म्हणाले की, कर्करोगाच्या उपचारात 'अर्ली डिटेक्शन' म्हणजेच सुरुवातीच्या टप्प्यात निदान होणे अत्यंत महत्त्वाचे असते. कर्करोग पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यात आढळल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होण्याची शक्यता सर्वाधिक असते. याच धर्तीवर राज्यात जनजागृती, निदान आणि उपचार या त्रिसूत्रीच्या आधारे मोहीम राबवली जात आहे. सध्या राज्यातील ८ परिमंडळांमध्ये 'कर्करोग निदान व्हॅन'द्वारे तपासणी सुरू असून, आतापर्यंत ३ कोटींपेक्षा जास्त नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.

कर्करोग उपचारांसाठी राज्य सरकारचे मोठे निर्णय:
२७ डे-केअर युनिट्स: कर्करुग्णांना त्यांच्या जवळच्या भागात उपचार मिळावेत यासाठी राज्यात २७ ठिकाणी विशेष डे-केअर युनिट्स सुरू करण्यात येत आहेत.
महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा विस्तार: या योजनेअंतर्गत कर्करोग उपचार पॅकेजचे पुनरावलोकन करण्यात आले आहे. आता यामध्ये रेडिओथेरपी, केमोथेरपी, इम्युनोथेरपी आणि पीईटी (PET) स्कॅन यांसारख्या आधुनिक व महागड्या उपचारांचा अधिक व्यापक समावेश करण्याचे शासनाचे नियोजन आहे.
गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला आळा: राज्यातील १४ ते १५ वर्षे वयोगटातील मुलींसाठी 'एचपीव्ही' (HPV) लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे.
महाराष्ट्र कर्करोग वॉरियर्स (MCW): या उपक्रमाच्या माध्यमातून तज्ज्ञ ऑन्कोलॉजिस्टच्या मदतीने ग्रामीण व दुर्गम भागातही निदान आणि उपचार सेवा पुरवली जात आहे.

Advertisement

दक्षिण कोरियाच्या 'लिक्विड बायोप्सी' तंत्रज्ञानाचा वापर करणार?
सर्व प्रकारच्या कर्करोगाचे अत्यंत सुरुवातीला आणि अचूक निदान करण्यासाठी जगातील प्रगत देशांमध्ये 'लिक्विड बायोप्सी' (Liquid Biopsy) हे आधुनिक तंत्रज्ञान वापरले जाते. या बैठकीत दक्षिण कोरियाच्या 'आयएमबी' संस्थेने या तंत्रज्ञानाबाबत सादरीकरण (Presentation) केले. महाराष्ट्रात या तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल, यावर राज्यातील तज्ज्ञ डॉक्टरांनी सविस्तर मार्गदर्शन व अहवाल सादर करावा, अशा सूचना आरोग्यमंत्र्यांनी बैठकीत दिल्या.

एकत्रित प्रयत्नांनीच कर्करोग निर्मूलन शक्य
सार्वजनिक आरोग्य विभागासोबतच खासगी क्षेत्रातील नामांकित रुग्णालये, सेवाभावी संस्था आणि तज्ज्ञ डॉक्टरांनी एकत्र येऊन काम केल्यास राज्यातील कर्करोग निर्मूलनाचा संकल्प निश्चितच पूर्ण होईल, असा विश्वास आरोग्यमंत्र्यांनी शेवटी व्यक्त केला.

?s=20

Comments

No comments yet.