मुंबई, (प्रतिनिधी) २४ मे - राज्यातील प्रवाशांशी संवाद साधताना रिक्षा आणि टॅक्सी चालकांना व्यावहारिक मराठी भाषेचा वापर करता यावा, यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. "राज्यातील अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांनी १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत व्यावहारिक मराठी भाषा शिकणे सक्तीचे आहे," असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे. १६ ऑगस्टनंतर यासाठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट कायदेशीर कारवाई केली जाईल, असा कडक इशाराही त्यांनी दिला आहे. मंत्रालयात आयोजित रिक्षा-टॅक्सी चालकांच्या मराठी भाषा प्रशिक्षणासंदर्भातील उच्चस्तरीय बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, सहआयुक्त रवी गायकवाड यांच्यासह मराठी भाषा विभाग आणि साहित्य संघाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
कशी असणार प्रशिक्षण प्रणाली?
मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी परिवहन विभागाने कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांच्याशी हातमिळवणी केली आहे.
अभ्यास केंद्रे: राज्यभरात विशेष मराठी भाषा अभ्यास केंद्रे उभारली जाणार आहेत. याशिवाय, रिक्षा संघटना आणि शिवसेना शाखांमधील उपलब्ध जागांमध्येही १५ ऑगस्टपर्यंत ही केंद्रे चालविली जातील.
वेळापत्रक: चालकांच्या सोयीनुसार हे प्रशिक्षण ऑनलाईन आणि ऑफलाईन (प्रत्यक्ष केंद्र) अशा दोन्ही पद्धतींनी उपलब्ध असेल. प्रत्येक महिन्यातील ४ शनिवार आणि रविवार मिळून किमान ४ तासांचा हा अभ्यासक्रम असेल.
४,००० शिक्षकांचा सहभाग: या मोहिमेत सुमारे चार हजार शिक्षक सहभागी होणार आहेत. काही शिक्षक हे प्रशिक्षण विनामूल्य देणार आहेत, तर काहींना प्रति तास १,००० रुपये मानधन दिले जाईल.
मानधनासाठी २ कोटी रुपयांची तरतूद
या उपक्रमासाठी लागणाऱ्या मानधनाचा खर्च उचलण्यासाठी मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार मराठी भाषा विभागाकडून २ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत, तर उर्वरित खर्च परिवहन विभाग करणार आहे.
तोंडी परीक्षा आणि प्रमाणपत्र
प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या चालकांना परिवहन विभागामार्फत अधिकृत प्रमाणपत्र दिले जाईल. हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी चालकांची मराठी भाषेवरील व्यावहारिक क्षमता तपासणारी एक तोंडी परीक्षा प्रशिक्षण केंद्रांमध्ये घेतली जाणार आहे.
प्रशिक्षणाची पूर्वतयारी आणि वैशिष्ट्ये:
सोपा अभ्यासक्रम: चालकांसाठी सचित्र आणि सोप्या भाषेतील पाठ्यक्रम पुस्तिका (Work-book) तयार करण्यात आली आहे.
जनजागृती: रिक्षा-टॅक्सीसह ओला (Ola), उबेर (Uber) आणि रॅपिडो (Rapido) सारख्या ॲप-आधारित वाहनांवरही मराठी भाषे संदर्भातील जनजागृती स्टिकर्स आणि बॅनर्स लावले जाणार आहेत.
चालकांची बैठक: या मोहिमेच्या नियोजनासाठी मंगळवारी रिक्षा-टॅक्सी चालकांची विशेष बैठक बोलावण्यात आली असून, त्यांना या विनामूल्य सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
?s=20