मृत्यूनंतरही डॉक्टर विझवून गेल्या अनेकांच्या जगण्याचा अंधार... अवयवदानामुळे ५ जणांना मिळाले नवजीवन...

Share:
Main Image
Last updated: 24-May-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २४ मे - "रुग्णांचे प्राण वाचवणे हेच डॉक्टरांचे आद्यकर्तव्य असते, मात्र मृत्यूनंतरही पाच जणांना नवजीवन देऊन एका महिला डॉक्टरांनी हे कर्तव्य अमर केले आहे." नाशिकमधील ५४ वर्षीय महिला डॉक्टर विजयालक्ष्मी विनायक खैरे (नाव बदललेले) यांच्या मेंदूमृत्यूनंतर (ब्रेन स्टेम डेथ) त्यांच्या कुटुंबीयांनी अत्यंत संवेदनशील व धाडसी निर्णय घेत अवयवदान केले. त्यांच्या या दातृत्वामुळे दोन रुग्णांना नवीन आयुष्य तर तिघांना नवी दृष्टी व आरोग्य लाभले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील या कुटुंबीयाने घेतलेल्या निर्णयाचे संपूर्ण शहरातून कौतुक होत आहे.

डॉ. विजयालक्ष्मी यांच्यावर प्रारंभी मेडिनोव्हा शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांच्या मेंदूला कायमस्वरूपी इजा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रुग्ण कुटुंब स्वतः वैद्यकीय क्षेत्रातील असल्याने, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी स्वतःहून अवयवदानाचा उदात्त निर्णय घेतला. पुढील शासकीय कायदेशीर प्रक्रियेसाठी २० मे २०२६ रोजी त्यांना नाईन पर्ल्स हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.

६ तासांच्या चाचण्यांनंतर 'ब्रेन डेथ' घोषित
नाईन पर्ल्स हॉस्पिटलमध्ये न्यूरोलॉजिस्ट डॉ. धनंजय दुबेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी केली असता रुग्ण प्रतिसाद देत नसल्याचे समोर आले. मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा १९९४ नुसार, ब्रेन स्टेम डेथ समितीच्या चार सदस्यांनी ६ तासांच्या अंतराने दोन अप्निया (Apnea) चाचण्या घेतल्या. त्यानंतर रुग्णाला अधिकृतरीत्या 'मेंदूमृत' घोषित करण्यात आले.

Advertisement

नाशिक ते पुणे 'ग्रीन कॉरिडॉर'चा थरार
झोनल ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेशन सेंटर (ZTCC), पुणे यांच्या मार्गदर्शनानुसार अवयवांचे वाटप करण्यात आले. पुणे येथे लिव्हर आणि किडनी तातडीने पोहोचवणे आवश्यक होते. यासाठी नाशिक, अहिल्यानगर (अहमदनगर) आणि पुणे पोलिसांनी तात्काळ समन्वय साधत 'ग्रीन कॉरिडॉर' तयार केला. वाहतुकीचे सारे अडथळे दूर करत अवघ्या ३ तासांत अवयव पुण्यात पोहोचविण्यात आले.

असे झाले अवयवांचे वाटप:
पहिली किडनी: नाईन पर्ल्स हॉस्पिटल, नाशिक (येथील गरजू रुग्णावर प्रत्यारोपण).
दुसरी किडनी: डी. वाय. पाटील रुग्णालय, पुणे.
लिव्हर (यकृत): मेडिकव्हर हॉस्पिटल, पुणे.
दोन्ही नेत्र: सुशील नेत्रपेढी, नाशिक. (दोन दृष्टिहीन रुग्णांना लवकरच दृष्टी मिळणार).

२० मिनिटांत नेत्र संकलन
कुटुंबीयांच्या संमतीनंतर अवयवदानाची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यात आली. सुशील नेत्रपेढीचे समन्वयक राहुलदेव जाधव आणि त्यांची टीम अवघ्या १५ मिनिटांत रुग्णालयात दाखल झाली आणि अवघ्या २० मिनिटांत नेत्र संकलनाची प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली.

डॉक्टरांच्या टीमचे यशस्वी समन्वय
या संपूर्ण प्रक्रियेमध्ये नाईन पर्ल्स हॉस्पिटलचे संचालक डॉ. नागेश अघोर यांनी अत्यंत काळजीपूर्वक लक्ष घालून सर्वांशी योग्य समन्वय साधला. शताब्दी हॉस्पिटलचे डॉ. अमित येवले, डॉ. सुमित मंडाले आणि नाईन पर्ल्सचे डॉ. सचिन कुमार पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच प्रत्यारोपण समन्वयक अमोल दुगजे यांनी सक्रिय सहभाग घेतला.
यावेळी डॉ. राजेंद्र देशमुख, डॉ. योगेश चौधरी, डॉ. दिनेश वाघ, डॉ. हुसेन बोहरी, डॉ. शीतल कुमार हिरण, इंटेन्सिव्हिस्ट डॉ. आशा देशमुख, डॉ. विनायक शेंडगे व रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते. मृत्यूनंतरही अनेकांच्या आयुष्यात प्रकाश पेरणाऱ्या या डॉक्टर कुटुंबाचा निर्णय समाजासाठी अत्यंत प्रेरणादायी ठरला आहे.

Comments

No comments yet.