अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणाऱ्या रोड रोमिओला बेड्या... सातपूर परिसरातील घटना...

Share:
Main Image
Last updated: 23-May-2026

 नाशिक, (प्रतिनिधी) २३ मे - शहरातील सातपूर औद्योगिक वसाहतीतील श्रमिकनगर भागात एकतर्फी प्रेमातून एका अल्पवयीन मुलीचा सतत पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकाराला विरोध केला असता संशयिताने पीडितेच्या संपूर्ण कुटुंबीयांना रस्त्यात अडवून अश्लील शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून सातपूर पोलीस ठाण्यात बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा (पोक्सो - POCSO) आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संशयिताला तात्काळ अटक केली आहे.

डिसेंबर महिन्यापासूनच लावला होता पाश
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शैलेश प्रदीप शेंडगे (वय २६, रा. धात्रक चौक, श्रमिकनगर, सातपूर, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या संशयित नराधमाचे नाव आहे. पीडित अल्पवयीन मुलीने सातपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित शैलेश हा गेल्या डिसेंबर २०२५ पासून तिच्यावर वाईट नजर ठेवून होता. डिसेंबर महिन्यात मुलगी जेव्हा आपल्या मावशीच्या घरी जात होती, तेव्हा संशयिताने पहिल्यांदा तिचा रस्ता अडवून अश्लील चाळे करत विनयभंग केला होता. त्यानंतर जानेवारी २०२६ पासून तो सातत्याने तिचा पाठलाग करून मानसिक व शारीरिक त्रास देत होता.

Advertisement

संपूर्ण कुटुंबीयांना दिली जीवे मारण्याची धमकी!
संशयिताचा त्रास असह्य झाल्याने पीडित मुलीने धाडस करून हा सर्व प्रकार आपल्या कुटुंबीयांच्या कानावर घातला. त्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी संशयित शैलेशला समज देण्याचा प्रयत्न केला असता, त्याने थेट मुलीच्या घरात आणि परिसरात येऊन हैदोस घातला. त्याने पीडित मुलीसह तिच्या वडिलांना, सख्ख्या भावाला आणि मामाला जाहीरपणे अश्लील शिवीगाळ केली. "जर माझ्या मध्ये आलात, तर तुम्हा सर्वांना जीवे ठार मारीन," अशी धमकी त्याने दिली.
या प्रकारामुळे पीडित कुटुंब प्रचंड दहशतीखाली आले होते. अखेर त्यांनी सातपूर पोलीस ठाणे गाठून संशयिताविरुद्ध अधिकृत गुन्हा नोंदवला.

पोलिसांची तत्परता; संशयित गजाआड
अल्पवयीन मुलीचा छळ आणि संपूर्ण कुटुंबाला धमकी दिल्याचे गांभीर्य ओळखून सातपूर पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ ॲक्शन मोडमध्ये आले. पोलिसांनी श्रमिकनगर भागात छापा टाकून संशयित शैलेश शेंडगे याला काही तासांतच बेड्या ठोकल्या. त्याच्यावर पोक्सो अंतर्गत कडक कलमे लावण्यात आली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भडांगे करत आहेत.

Comments

No comments yet.