नाशिक, (प्रतिनिधी) २३ मे - पालकांची अवघी दोन मिनिटांची नजरचूक एका निष्पाप चिमुरडीच्या जीवावर बेतल्याची अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना आडगाव परिसरात घडली आहे. घरात खेळत असताना अचानक बाथरूममधील पाण्याने भरलेल्या बादलीत डोकावून पाहण्याच्या नादात एक वर्षीय चिमुरडी बादलीत कोसळली. पाण्यात गुदमरल्याने या चिमुरडीचा मृत्यू झाला असून, या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
खेळता खेळता बाथरूममध्ये गेली...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंदवी दत्तात्रेय भोसले (वय १ वर्ष, रा. भोसले मळा, आडगाव फाटा, नाशिक) असे मृत्यू झालेल्या दुर्दैवी चिमुरडीचे नाव आहे. हिंदवी ही शुक्रवारी (दि. २२ मे) दुपारच्या सुमारास आपल्या घरात नेहमीप्रमाणे खेळत होती. घरातील सदस्य आपापल्या कामात व्यस्त असताना, सर्वांची नजर चुकवून चिमुरडी हिंदवी खेळता खेळता बाथरूमच्या दिशेने गेली.
बाथरूममध्ये पाण्याचा हंडा आणि बादली भरून ठेवलेली होती. पाणी पाहून हिंदवी तिथेच खेळू लागली. पाणी खेळण्याच्या नादात ती बादलीत नेमके काय आहे, हे डोकावून पाहत असताना अचानक तिचा तोल गेला आणि ती थेट पाण्याने काठोकाठ भरलेल्या बादलीत पालथी कोसळली.
गुदमरून मृत्यू; वैद्यकीय क्षेत्रातून हळहळ
काही वेळाने घरात मुलगी दिसत नसल्याने पालकांनी तिची शोधाशोध सुरू केली. बाथरूममध्ये जाऊन पाहिले असता हिंदवी बादलीतील पाण्यात निपचित पडलेली आढळून आली. हा प्रकार पाहताच पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी तात्काळ तिला उचलून उपचारासाठी जवळच असलेल्या आडगाव मेडिकल कॉलेज व रुग्णालयात दाखल केले.
मात्र, रुग्णालयात तपासणीपूर्वीच डॉ. मोमीन शकूर यांनी तिला तपासून मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
पोलिसांत नोंद; हवालदार पाटील करताहेत तपास
या दुर्घटनेनंतर आडगाव मेडिकल कॉलेजच्या डॉ. प्राजक्ता देवरे यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आडगाव पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस हवालदार पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
पालकांनो सावधान!
लहान मुले अत्यंत चपळ असतात आणि त्यांना पाण्याची मोठी ओढ असते. घरात लहान मुले असल्यास बाथरूमचे दरवाजे नेहमी कडे लावून बंद ठेवावेत. तसेच पाणी भरलेले टब, बादल्या किंवा हौद उघडे ठेवू नयेत, जेणेकरून अशा दुर्दैवी दुर्घटना टाळता येतील, असे आवाहन पोलीस आणि डॉक्टरांनी केले आहे.