सातबाऱ्यासाठी लाच घेणारा तलाठी ‘एसीबी’च्या जाळ्यात... लाचेची रक्कम फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न...

Share:
Main Image
Last updated: 23-May-2026

 

देवळा, (प्रतिनिधी) २३ मे २०२६ - बहिणीच्या हक्कसोड पत्रानुसार ७/१२ उताऱ्यावरून नाव कमी करताना, चुकीने मूळ तक्रारदाराचेही नाव कमी करून ते पुन्हा लावण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या आणि ती स्वीकारणाऱ्या खामखेडा येथील तलाठ्याला नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे. या कारवाईदरम्यान शासकीय वाहनात बसवल्यानंतर खिशातील लाचेचे पैसे बाहेर फेकून पुरावा नष्ट करण्याचा अयशस्वी प्रयत्नही संबंधित तलाठ्याने केला. याप्रकरणी लाचखोर तलाठी आणि त्याला प्रोत्साहन देणाऱ्या एका खाजगी मजुरा विरोधात देवळा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

...आणि ७/१२ वरून स्वतःचेच नाव गायब झाले!

'एसीबी'ने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील मूळ तक्रारदार यांच्या खामखेडा शिवारातील शेतगट क्रमांक १२७ मधून त्यांच्या बहिणीचे नाव हक्कसोड पत्रान्वये कमी करायचे होते. त्यासाठी त्यांनी खामखेडा सजाचे तलाठी पप्पू काशिनाथ सोनकांबळे यांच्याकडे अधिकृत अर्ज केला होता. मात्र, बहिणीचे नाव कमी करताना तलाठ्याने मूळ तक्रारदाराचे देखील नाव ७/१२ उताऱ्यावरून कमी केले. हा घोळ लक्षात आल्यानंतर तक्रारदार हे तलाठ्याकडे विचारपूस करण्यासाठी गेले असता, 'पुन्हा नाव लावून देतो' असे सांगत तलाठी सोनकांबळे याने ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.

टीव्हीएस शोरूमसमोर रचला सापळा

तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी या संदर्भात थेट नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) रीतसर तक्रार नोंदवली. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर, २२ मे २०२६ रोजी दुपारी १५:३६ ते १६:५० वाजेच्या दरम्यान देवळा येथील वाजगाव रोडवर असलेल्या टीव्हीएस मोटारसायकल शोरूमसमोर सापळा रचण्यात आला.

या वेळी तेथे उपस्थित असलेला खाजगी मजूर प्रशांत दावल सोनवणे याने तक्रारदाराला लाच देण्यासाठी प्रोत्साहन दिले. तलाठी पप्पू सोनकांबळे याने यापूर्वी घेतलेले १,००० रुपये स्वीकारल्याचे मान्य केले आणि उर्वरित ५,००० रुपयांची लाच (५०० रुपयांच्या १० नोटा) स्वीकारताच एसीबीच्या पथकाने दोघांना रंगेहात दणका दिला.

Advertisement

लाचखोरांचा 'तो' थरार ठरला निष्फळ:

लाचेची रक्कम स्वीकारताना पकडल्यानंतर एसीबीच्या पथकाने तलाठी पप्पू सोनकांबळे याला शासकीय वाहनात (गाडीत) बसवले. मात्र, कारवाईतून वाचण्यासाठी त्याने गाडीत बसताच आपल्या खिशातील लाचेच्या नोटा तात्काळ खिडकीबाहेर फेकून दिल्या आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. परंतु, दक्ष असलेल्या एसीबीच्या पथकाने फेकलेले पैसे जप्त करत त्याचा हा प्रयत्न उधळून लावला.

गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे:

१. लोकसेवक: पप्पू काशिनाथ सोनकांबळे (वय ४६, व्यवसाय- नोकरी तलाठी खामखेडा वर्ग-३, रा. आहेरमळा, कळवण रोड, ता. देवळा. मूळ रा. देवळाली कॅम्प, नाशिक).

२. खाजगी इसम: प्रशांत दावल सोनवणे (वय २४, धंदा- मजुरी, रा. खामखेडा, ता. देवळा, जि. नाशिक).

कारवाई करणारे पथक:

सदर धडाकेबाज कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक एकनाथ गंगाराम पाटील, पोलीस हवालदार योगेश साळवे, पोलीस कॉन्स्टेबल चेतन शेवाळे आणि चालक परशुराम जाधव यांच्या पथकाने केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीमती नेहा सूर्यवंशी करत आहेत

 

Comments

No comments yet.