जनगणनेचा ‘हायटेक पॅटर्न’... ड्रोन कॅमेऱ्याने प्रभागाचा डिजिटल नकाशा...

Share:
Main Image
Last updated: 24-May-2026

अहिल्यानगर, (प्रतिनिधी) २४ मे - भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या वतीने देशात पहिल्यांदाच राबविल्या जाणाऱ्या ‘डिजिटल जनगणना’ उपक्रमाला अहिल्यानगरमध्ये तंत्रज्ञानाची मोठी जोड मिळाली आहे. महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या जनगणनेच्या पूर्वतयारीत प्रगणक (Enumerator) म्हणून कार्यरत असलेले स्थानिक शिक्षक डॉ. अमोल बागुल यांनी ड्रोन तंत्रज्ञानाचा (Drone Technology) वापर करून आपल्या संपूर्ण कार्यक्षेत्राचा अचूक डिजिटल नकाशा तयार केला आहे. जनगणनेच्या कामात अशा प्रकारे ड्रोनचा वापर करण्याचा राज्यातील हा पहिलाच आणि अत्यंत अभिनव उपक्रम मानला जात आहे.

८ किमी परिघातील घराघरांची अचूक नोंद

डॉ. अमोल बागुल यांना जनगणनेसाठी नेमून दिलेल्या प्रभागाची भौगोलिक रचना क्लिष्ट असल्याने, त्यांनी पारंपारिक पद्धतीऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेतला.

हवाई छायाचित्रण (Aerial Mapping): ड्रोनच्या साहाय्याने संपूर्ण परिसराचे हाय-रिझोल्यूशन हवाई छायाचित्रण करण्यात आले.

अचूक सूक्ष्म मोजणी: या फोटोंच्या आधारे प्रभागातील मुख्य रस्ते, अंतर्गत गल्ल्या, इमारती, झोपडपट्ट्या, प्रमुख ठिकाणे आणि भौगोलिक सीमांचे बारकाईने निरीक्षण करण्यात आले. या सर्व डेटाच्या आधारे जनगणना कार्यासाठी अत्यंत उपयुक्त आणि अचूक असा 'थ्री-डी' डिजिटल नकाशा तयार करण्यात आला.

घरभेटी आणि नियोजन करणे होणार अधिक सुलभ

Advertisement

या डिजिटल नकाशामुळे प्रगणकांना प्रत्यक्ष मैदानावर काम करणे अतिशय सोपे होणार आहे. कोणत्या गल्लीत किती घरे आहेत, कोणत्या इमारतीची नोंद कशी करायची, याचा पूर्वआराखडा आधीच तयार असल्याने वेळ आणि श्रम यांची मोठी बचत होणार आहे.

इतर प्रगणकांसाठी हा उपक्रम प्रेरणादायी!  "डिजिटल जनगणनेच्या पार्श्वभूमीवर ड्रोनचा हा वापर अत्यंत कौतुकास्पद आहे. या उपक्रमामुळे घरांची अचूक नोंद करणे, क्षेत्रनिहाय नियोजन करणे आणि घरभेटी घेणे प्रशासनाला अधिक सुलभ होईल. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे मानवी चुका टळतील आणि प्रक्रियेतील अचूकता वाढेल. डॉ. बागुल यांचा हा प्रयत्न इतर कर्मचाऱ्यांसाठीही प्रेरणादायी ठरेल."

- यशवंत डांगे, आयुक्त तथा मुख्य जनगणना अधिकारी, अहिल्यानगर मनपा

'डिजिटल इंडिया'च्या दिशेने प्रभावी पाऊल

"जनगणना हे अत्यंत महत्त्वाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. जर आपण या राष्ट्रीय कार्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला, तर हे काम अत्यंत पारदर्शक आणि परिणामकारक होऊ शकते. याच भावनेतून मी हा डिजिटल नकाशा तयार करण्याचा छोटासा प्रयत्न केला," असे मत डॉ. अमोल बागुल यांनी या वेळी व्यक्त केले.

या उपक्रमाच्या सादरीकरणाप्रसंगी सहायक आयुक्त मेहेर लहारे, प्रभाग अधिकारी बाळासाहेब पवार, मास्टर ट्रेनर डॉ. संतोष देशमुख, रफिक देशमुख आणि पर्यवेक्षक अलका दहातोंडे यांच्यासह मनपाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अहिल्यानगरमधील या 'हायटेक जनगणनेची' सध्या संपूर्ण महसूल आणि प्रशासकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

Comments

No comments yet.