नीट घोटाळ्यात पुण्यात ‘मनीषा’ नावाच्या आरोपींची हॅटट्रिक... पेपर सेट करणाऱ्या प्रा. मनीषा हवालदारला बेड्या...

Share:
Main Image
Last updated: 22-May-2026

पुणे, (प्रतिनिधी) २२ मे - देशातील वैद्यकीय प्रवेश परीक्षा म्हणजेच 'NEET २०२६' च्या पेपरफुटी प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (SIT) पुण्यातून आणखी एका मोठ्या माशावर जाळे टाकले आहे. पुण्यातील एका नामांकित शाळेतील भौतिकशास्त्र (Physics) विषयाच्या तज्ज्ञ प्राध्यापिका प्रा. मनीषा हवालदार हिला पोलिसांनी अधिकृतपणे अटक केली आहे. प्रा. हवालदार ही गेल्या अनेक वर्षांपासून थेट एनटीए (NTA) च्या 'NEET पेपर सेट' करणाऱ्या पॅनलमध्ये कार्यरत असल्याची खळबळजनक माहिती प्राथमिक तपासात उघड झाली आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण पेपरफुटीच्या घोटाळ्यात पुण्यातून अटक करण्यात आलेली ही एकाच नावाची (मनीषा) सलग तिसरी महिला आरोपी ठरल्याने पोलीस यंत्रणाही थक्क झाल्या आहेत.

पुण्यात लागली 'मनीषा' नावाच्या आरोपींची हॅटट्रिक

नीट घोटाळ्याचा पुणे आणि लातूर पॅटर्न उघडकीस आल्यापासून तपास यंत्रणांनी पुण्यात आपला मुक्काम ठोकला आहे. या तपासादरम्यान पुण्यातून आधी मनीषा वाघमारे आणि मनीषा मांढरे या दोन महिलांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. आता या दोन महिला आरोपींच्या चौकशीतून आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी प्रा. मनीषा हवालदार हिच्या मुसक्या आवळल्या आहेत.

'फिजिक्स'चे प्रश्न कोट्यवधी रुपयांना विकल्याचा संशय

अटक करण्यात आलेली संशयित आरोपी प्रा. मनीषा हवालदार ही पुण्यातील प्रसिद्ध 'सेठ हिरालाल सराफ प्रशाला' येथे वरिष्ठ भौतिकशास्त्र प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे.

मुख्य आरोप: प्रा. हवालदार हिच्याकडे यंदाच्या नीट परीक्षेच्या भौतिकशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका सेट करण्याची जबाबदारी होती. तिने गोपनीयतेचा भंग करून परीक्षेपूर्वीच 'फिजिक्स'चे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न लीक केल्याचा तिच्यावर थेट आरोप आहे.

Advertisement

RCC लातूरशी कनेक्शन:

हे प्रश्न तिने लातूरच्या 'आरसीसी' (RCC) क्लासेसचा मुख्य सूत्रधार शिवराज मोटेगावकर याच्यापर्यंत पोहोचवल्याचा संशय आहे.

मोटेगावकरच्या चौकशीतून फुटले बिंग!

लातूरच्या 'आरसीसी' क्लासेसचा संचालक शिवराज रघुनाथ मोटेगावकर याला तपास यंत्रणांनी यापूर्वीच अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. कालच पुण्यात त्याच्या बेकायदेशीर क्लासवर मनपाने बुलडोझर चालवला होता, तर लातूरमधील त्याच्या ८ एकरांतील मेगा प्रोजेक्टचे व्हिडिओ समोर आले होते. मोटेगावकरच्या बँक खात्यांचे व्यवहार आणि मोबाईल चॅट्स तपासत असताना प्रा. मनीषा हवालदार हिचे नाव समोर आले. पेपर सेट करणाऱ्या यंत्रणेतील मुख्य व्यक्तीच फितूर झाल्याचे समोर आल्याने संपूर्ण देशभरातील नीट परीक्षेच्या पारदर्शकतेवर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

याप्रकरणी प्रा. हवालदार हिला पुणे न्यायालयात हजर केले जाणार असून, तिने हे प्रश्न आणखी कोणाकोणाला विकले आणि या बदल्यात किती कोटींची लाच घेतली, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.

?s=20

Comments

No comments yet.