नाशिकमध्ये चीड आणणारी घटना... मुलांचा जीव घेण्याची धमकी देत विवाहितेचा विनयभंग... पीडितेने केला आत्महत्येचा प्रयत्न...

Share:
Main Image
Last updated: 22-May-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २२ मे - घरात एकटी असलेल्या विवाहितेचा चाकूचा धाक दाखवून विनयभंग केल्याची आणि त्यानंतर भेदरलेल्या महिलेने फिनाईल प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना मखमलाबाद रोड भागात घडली आहे. या घटनेची गांभीर्याने दखल घेत पंचवटी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संशयित आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. पीडित महिलेवर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

चाकूचा धाक आणि मुलांचा जीव घेण्याची धमकी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जय गणेश कोठुळे (वय २०, रा. दत्तनगर, पेठ रोड, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या संशयित नराधमाचे नाव आहे. मखमलाबाद रोडवरील जाधव कॉलनी भागात राहणारी पीडित विवाहित महिला गेल्या मंगळवारी (दि. १९ मे) दुपारच्या सुमारास घरात एकटीच होती. तिची मुले घराबाहेर खेळण्यासाठी गेल्याची संधी साधून संशयित जय कोठुळे हातात चाकू घेऊन तिच्या घरात घुसला. त्याने विवाहितेकडे जबरदस्तीने प्रेमाची मागणी केली. पीडितेने याला कडाडून विरोध केला असता, "जर तू मला नाही म्हणालीस, तर तुझ्या मुलांना मारून टाकेन," अशी अंगावर काटा आणणारी धमकी त्याने दिली आणि तिचा विनयभंग केला. 'तुला विचार करण्यासाठी दोन दिवसांची मुदत देतो,' असे म्हणत संशयित तिथून पसार झाला होता.

Advertisement

भीतीच्या पोटी विवाहितेचे टोकाचे पाऊल

संशयिताने दिलेल्या भयानक धमकीमुळे विवाहित महिला प्रचंड मानसिक धक्क्याखाली आणि भीतीखाली वावरत होती. आपल्या मुलांच्या जिवाला धोका निर्माण होईल या भीतीने अखेर गुरुवारी (दि. २१ मे) तिने घरात फिनाईल प्राशन करून जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पीडित महिलेने दिलेल्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी संशयित जय कोठुळे याच्याविरुद्ध विनयभंग, धमकी आणि इतर कलमांन्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत संशयिताला तात्काळ बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक दत्तात्रेय शेळके या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Comments

No comments yet.