सह्याद्रीच्या दुर्गम पाड्यांतील 'पाणी मॉडेल' जागतिक व्यासपीठावर... सिंगापूर आंतरराष्ट्रीय जलपरिषदेत 'SNF'ची निवड...

Share:
Main Image
Last updated: 22-May-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २२ मे - महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या डोंगरकपाऱ्यांत आणि दुर्गम आदिवासी पाड्यांमध्ये पाणी तसेच मूलभूत विकासासाठी काम करणाऱ्या 'सोशल नेटवर्किंग फोरम' (SNF) या संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. जून २०२६ मध्ये सिंगापूर येथे आयोजित होणाऱ्या प्रतिष्ठित 'आंतरराष्ट्रीय जलपरिषदेत' (International Water Week) सोशल नेटवर्किंग फोरमच्या जल प्रकल्प मॉडेलची 'पेपर प्रेझेंटेशन'साठी (शोधनिबंध सादरीकरण) अधिकृत निवड झाली आहे. दुर्गम भागात लोकसहभागातून राबवलेला हा पाणी पॅटर्न आता जागतिक स्तरावर कौतुकाचा विषय ठरला असून, हा अनुभव जगभरातील जलतज्ज्ञ आणि आंतरराष्ट्रीय धोरणकर्त्यांसमोर सादर केला जाणार आहे.

'पाणी' हाच विकासाचा केंद्रबिंदू!

या जागतिक परिषदेत "Water as a Catalyst: A Nexus-Based Model for Tribal Empowerment in Rural India” (उत्प्रेरक म्हणून पाणी: ग्रामीण भारतातील आदिवासी सक्षमीकरणासाठी एक केंद्रबिंदू मॉडेल) या महत्त्वपूर्ण विषयांतर्गत हा शोधनिबंध मांडला जाईल. पाणी ही केवळ मानवाची मूलभूत गरज नसून, ती ग्रामीण भागात शिक्षण, आरोग्य, पोषण, रोजगार आणि सामाजिक सक्षमीकरणाचा मुख्य केंद्रबिंदू कशी ठरू शकते, हे या मॉडेलच्या माध्यमातून सिद्ध करून दाखवण्यात आले आहे.

Advertisement

२०१० ते २०२६: संघर्षातून जागतिक यशाकडे

"२०१० साली जेव्हा दुर्गम आदिवासी पाड्यांमध्ये पाण्याचा प्रश्न आणि मूलभूत समस्यांवर काम करायला सुरुवात केली, तेव्हा हे काम कधी जागतिक व्यासपीठावर पोहोचेल असे वाटले नव्हते," अशा भावना 'SNF'चे संस्थापक प्रमोद गायकवाड यांनी व्यक्त केल्या.

ते पुढे म्हणाले की, "सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये घडलेला आदिवासी विकासाचा हा अनुभव जागतिक स्तरावर मांडला जाणे ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. हे यश या संपूर्ण प्रवासात 'एसएनएफ'वर विश्वास ठेवणारे जगभरातील सहकारी आणि स्वतःच्या संघर्षातून विकासाचा नवा मार्ग उभा करणाऱ्या दुर्गम पाड्यांवरील प्रत्येक आदिवासी बांधवाचे आहे."

सोशल नेटवर्किंग फोरमच्या या आंतरराष्ट्रीय निवडीबद्दल राज्यातील सामाजिक आणि पर्यावरण क्षेत्रातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Comments

No comments yet.