राज्यातील इंधन साठ्याबाबत पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे महत्त्वाचे अपडेट... तत्काळ जाणून घ्या... (व्हिडीओ)

Share:
Main Image
Last updated: 22-May-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २२ मे - "गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात इंधनटंचाई निर्माण होणार असल्याच्या काही अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र, महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून राज्यात कोणत्याही प्रकारची इंधनटंचाई नाही," अशी ग्वाही राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त इंधनाची खरेदी करून साठवणूक करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

मे महिन्यात विक्रीत २० टक्क्यांची वाढ

मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना छगन भुजबळ यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांत राज्यातील अनेक पेट्रोल पंपांवर गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी (Panic Buying) होत असल्याचे निदर्शनास आले आहे. केवळ भीतीच्या वातावरणामुळे नागरिक वाहनांमध्ये आणि अतिरिक्त कॅनमध्ये इंधन भरून ठेवत आहेत. यामुळेच मे महिन्यात नेहमीच्या सरासरी तुलनेत सुमारे २० टक्के अधिक पेट्रोल आणि डिझेलची विक्री झाल्याची माहिती त्यांनी दिली.

Advertisement

केंद्र अन् राज्य सरकार सक्षम

अन्न व नागरी पुरवठा मंत्री पुढे म्हणाले, “देशाचे पंतप्रधान, केंद्र सरकार आणि राज्य सरकार प्रत्येक नागरिकाला पुरेशा प्रमाणात इंधन उपलब्ध करून देण्यास पूर्णपणे सक्षम आहे. पुरवठा साखळी सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन सर्व पातळ्यांवर लक्ष ठेवून आहे. त्यामुळे कोणत्याही चुकीच्या अफवांना बळी पडून अतिरिक्त साठा करण्याची अजिबात आवश्यकता नाही.”

यावेळी भुजबळ यांनी राज्यातील विविध जिल्ह्यांमधील गेल्या काही दिवसांतील इंधन विक्रीची अधिकृत आकडेवारीही माध्यमांसमोर मांडली. पुरवठा वेळेवर होण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा काम करत असून नागरिकांनी संयम बाळगून आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी शेवटी केले.

https://www.instagram.com/reel/DYof6e0pbt0/?igsh=eDV1OXMydmd3eDBo

Comments

No comments yet.