नवी दिल्ली, (प्रतिनिधी) २२ मे - देशात प्रतिबंधित असलेल्या निकोटीन उत्पादनांच्या अवैध आयातीविरोधात महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) देशव्यापी मोहीम राबवून एका मोठ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली आणि पश्चिम बंगालमधील विविध बंदरे, विमानतळे आणि इनलँड कंटेनर डेपो (ICD) मध्ये गेल्या काही दिवसांत केलेल्या धडक कारवाईत डीआरआयने तब्बल १२० कोटी रुपये किमतीच्या ३ लाख ई-सिगारेट्स (व्हेप्स) जप्त केल्या आहेत.
'फर्निचर'च्या नावाखाली चीनमधून आयात
मिळालेल्या खात्रीशीर गुप्त माहितीच्या आधारे डीआरआयने सीमाशुल्क (कस्टम) तपासणी टाळण्यासाठी चुकीची घोषणा करून मागवण्यात आलेल्या संशयास्पद मालावर पाळत ठेवली होती. या मालाचा बारकाईने मागोवा घेत अधिकाऱ्यांनी तो जप्त केला. सखोल तपासणी केली असता, चीनमधून आयात करण्यात आलेल्या या प्रतिबंधित ई-सिगारेट्स “फर्निचर” आणि “धातूच्या खुर्चीचे भाग” (Metal Chair Parts) असल्याचे भासवून भारतात आणल्या जात असल्याचे उघडकीस आले. जप्त करण्यात आलेल्या ई-सिगारेट्स विविध ब्रँड्स, फ्लेवर्स आणि आकर्षक वैशिष्ट्यांच्या आहेत.
कायद्याने भारतात संपूर्ण बंदी
सार्वजनिक आरोग्य आणि तरुणांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी केंद्र सरकारने 'इलेक्ट्रॉनिक सिगारेट कायदा, २०१९' अंतर्गत भारतात सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक निकोटीन वितरण प्रणालीवर (ENDS) संपूर्ण बंदी घातली आहे. या कायद्यानुसार ई-सिगारेट्सचे उत्पादन, निर्मिती, आयात-निर्यात, वाहतूक, विक्री, वितरण, साठवणूक आणि जाहिरात करणे हा गंभीर गुन्हा आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेली ही जप्ती देशातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या कारवायांपैकी एक मानली जात असून, डीआरआय या रॅकेटच्या मुळाशी असणाऱ्या मुख्य सूत्रधारांचा शोध घेत आहे.