झाडाच्या फांद्या तोडताना पडल्याने मजूराचा मृत्यू... सातपूर औद्योगिक वसाहतीतील दुर्घटना...

Share:
Main Image
Last updated: 21-May-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २१ मे - सातपूर औद्योगिक वसाहतीतील एका नामांकित कारखान्यात गुरुवारी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. कारखाना आवारातील झाडांच्या फांद्या तोडत असताना झाडावरून अचानक तोल जाऊन खाली पडल्याने एका ५४ वर्षीय मजूराचा मृत्यू झाला. या घटनेत मजूराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, कारखाना व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणावर मृत मजूराच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले आहेत.

झाडावरून थेट जमिनीवर कोसळले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र रामजी देशमुख (वय ५४, रा. वाघेरा, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुर्दैवी मजूराचे नाव आहे. सातपूर औद्योगिक वसाहतीतील 'ज्योती सिरॅमिक इंडस्ट्रीज' या कारखान्याच्या आवारात ही घटना घडली.

कारखाना व्यवस्थापनाने आवारातील झाडांच्या वाढलेल्या फांद्या तोडण्यासाठी आणि छाटणी करण्यासाठी देशमुख यांना बोलावले होते. त्यानुसार बुधवारी (दि. २० मे) सकाळी ते कारखान्यात कामावर दाखल झाले होते. व्यवस्थापनाच्या सूचनेनुसार ते झाडावर चढून फांद्या तोडत असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि ते थेट उंचावरून सिमेंटच्या जमिनीवर कोसळले.

Advertisement

डोक्याला गंभीर दुखापत; डॉक्टरांनी मृत घोषित केले

झाडावरून कोसळताच देशमुख यांच्या डोक्याला आणि पाठीला अत्यंत गंभीर दुखापत झाली आणि ते रक्ताच्या थारोळ्यात पडले. कारखान्यातील इतर कामगारांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) दाखल केले. मात्र, रुग्णालयातील डॉक्टर निसर्ग धामणे यांनी त्यांना तपासताच उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

कारखाना व्यवस्थापन संशयाच्या भोऱ्यात!

या दुर्दैवी घटनेनंतर मृत देवेंद्र देशमुख यांच्या कुटुंबीयांनी कारखाना प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे. कंपनी व्यवस्थापनाने महापालिका किंवा संबंधित विभागाची कुठलीही पूर्वपरवानगी न घेता बेकायदेशीरपणे देशमुख यांना झाडे तोडण्यास सांगितले, तसेच त्यांना कोणतीही सुरक्षा साधने (Safety Gears) पुरवली नव्हती, असा थेट आरोप कुटुंबाने केला आहे.

सध्या पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करून तो नातेवाईकांच्या स्वाधीन केला असून सातपूर पोलीस ठाण्याचे हवालदार किशोर खरोटे या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत. कारखाना प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाला आहे का, याची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे.

Comments

No comments yet.