तुम्ही खाताय ते पनीर शुद्ध की खाद्यतेलाचे?  हॉटेलच्या चालाखीला चाप लावण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय...

Share:
Main Image
Last updated: 21-May-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २१ मे - तुम्ही हॉटेलमध्ये आवडीने खात असलेले 'शाही पनीर' किंवा पिझ्झावरील 'चीज' खरोखर दुधाचे आहे की वनस्पती तेलापासून बनवलेले? हे आता ग्राहकांना स्पष्टपणे कळणार आहे. हॉटेल्स, उपाहारगृहे, भोजन व्यवस्था पुरवठादार (Caterers) तसेच खाद्यपदार्थ विक्रेत्यांना त्यांच्या विक्री पावती (Bill), मेन्यू कार्ड तसेच दर फलकांवर ‘चीज ॲनालॉग’ (दुग्ध पर्यायी पदार्थ) चा स्पष्ट उल्लेख करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे.

अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या निर्देशानुसार १ मे २०२६ पासून संपूर्ण महाराष्ट्रात याची कडक अंमलबजावणी केली जात आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्राने घेतलेल्या या धडाकेबाज निर्णयाची दखल आता केंद्र सरकारच्या 'अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाने' (FSSAI) घेतली असून, शुद्ध पनीरसाठी महाराष्ट्राने दाखवलेली ही दिशा संपूर्ण देशासाठी मार्गदर्शक ठरणार आहे.

 'पनीर' आणि 'चीज ॲनालॉग'मध्ये काय फरक आहे?
अन्न सुरक्षा नियमावलीनुसार दोन्ही पदार्थांमध्ये मोठा फरक आहे:
अस्सल पनीर/चीज: हे केवळ आणि केवळ शुद्ध दुधापासून तयार केले जाते.
चीज ॲनालॉग (Cheese Analogue): हे दिसायला हुबेहूब पनीर किंवा चीजसारखेच असते; मात्र ते दुधाऐवजी खाद्यतेल, स्टार्च, मिश्रक द्रव्ये आणि इतर रासायनिक घटकांच्या साहाय्याने तयार केले जाते. हा दुधाचा स्वस्त पर्याय आहे.

राज्यव्यापी मोहिमेचा धडाका; ३२० हॉटेल्सना नोटीस
या नव्या नियमाच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील २७५ अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि अमरावती विभागात व्यापक तपासणी मोहीम राबवली.
एकूण तपासलेली हॉटेल्स: १,४९६
नियमांचे पालन करणारी हॉटेल्स: ८७१ (ज्यांनी चीज ॲनालॉगचा स्पष्ट उल्लेख केला आहे)
कारवाई झालेली हॉटेल्स: ३२० हॉटेल्सना मेन्यू कार्ड किंवा बिलावर स्पष्ट उल्लेख न केल्यामुळे कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

Advertisement

दुग्धभेसळ रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
दुधातील आणि दुग्धजन्य पदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. यासाठी राज्यात दूध परीक्षण यंत्रे, त्वरित चाचणी संच (Rapid Testing Kits) आणि दूध विश्लेषण प्रणाली यांसारखी आधुनिक उपकरणे उपलब्ध करून दिली जात आहेत. तसेच, राज्यातील फिरत्या अन्न परीक्षण प्रयोगशाळांची (Mobile Food Testing Labs) संख्या वाढवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

 ग्राहकांनो, दिशाभूल झाल्यास 'येथे' तक्रार करा!
अन्न व औषध प्रशासनाने ग्राहकांना आवाहन केले आहे की, हॉटेलमध्ये किंवा दुकानात कोणताही पदार्थ खरेदी करताना त्यावरील माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचावे आणि तिथे ‘दुग्ध पर्यायी पदार्थ’ असा उल्लेख आहे का, याची खात्री करावी.

 महत्त्वाचा हेल्पलाईन नंबर:
जर कोणत्याही हॉटेलमध्ये 'चीज ॲनालॉग' वापरून ते अस्सल 'दूध पनीर' म्हणून विकले जात असेल किंवा ग्राहकांची दिशाभूल होत असेल, तर ग्राहक अन्न व औषध प्रशासनाच्या १८००-२२२-३६५ या विनामूल्य (Toll-Free) दूरध्वनी क्रमांकावर थेट तक्रार नोंदवू शकतात.

थोडक्यात काय तर...
ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि पनीरच्या नावाखाली स्वस्त पर्याय खपवणाऱ्या हॉटेल चालकांवर या मोहिमेमुळे मोठा चाप बसणार असून, ग्राहकांना ते काय खात आहेत याची अचूक माहिती मिळणार आहे.

Comments

No comments yet.