सलग ३ दिवस पाठलाग, मोहाली-पतियाळात सापळा...  'समृद्धी ज्वेलर्स' दरोड्याचे कनेक्शन पंजाबमध्ये उघड...

Share:
Main Image
Last updated: 21-May-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २१ मे - नाशिकच्या पंचवटी परिसरातील हिरावाडी येथील 'न्यू समृद्धी ज्वेलर्स'वर पडलेल्या धाडसी दरोड्याच्या गुन्ह्यातील दोन मुख्य आणि रेकॉर्डवरील सराईत आरोपींना नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेने थेट पंजाब राज्यातून बेड्या ठोकल्या आहेत. नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट क्र. १ आणि २ च्या संयुक्त पथकाने पंजाबमधील मोहाली आणि पतियाळा भागात तब्बल तीन दिवस अहोरात्र दबा धरून ही थरारक कामगिरी केली.

हिरावाडीतील त्या धाडसी दरोड्याचा थरार
११ मे २०२६ रोजी रात्री ९:०० वाजेच्या सुमारास पंचवटीतील हिरावाडी भागात असलेल्या 'न्यू समृद्धी ज्वेलर्स' या दुकानात ६ सशस्त्र आरोपींनी दरोडा टाकून सोन्या-चांदीचे दागिने लुटण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेमुळे नाशिकमधील सराफा व्यावसायिकांमध्ये मोठी घबराट पसरली होती. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा (गु.र.नं. २५३/२०२६, भा.न्या.सं. कलम ३१०(२), ३११ सह आर्म ॲक्ट) दाखल करण्यात आला होता.

तांत्रिक तपासाने दाखवली पंजाबची वाट
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाचे चक्र वेगाने फिरवण्याचे आदेश दिले होते.
गुन्हे शाखा युनिट १ व २ चे पथक समांतर तपास करत असताना, तांत्रिक विश्लेषण (Technical Analysis) आणि सायबर सेलच्या मदतीने आरोपींचे थेट पंजाबमधील वास्तव्य समोर आले. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे विशेष पथक तात्काळ नाशिकवरून पंजाबसाठी रवाना झाले.

Advertisement

...आणि मोहाली-पतियाळात आवळला पाश!
नाशिक पोलिसांच्या पथकाने पंजाबमध्ये पोहोचून स्थानिक पोलिसांच्या मदतीने अत्यंत गुप्तता बाळगत संशयितांचा माग काढला. सलग ३ दिवस सातत्याने पाठलाग करून अखेर दोन मुख्य आरोपींना मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे:
१. हनिषकुमार पिता महेंद्रसिंग (वय ४७, रा. कॉलेज कॉलनी, डेराबास्सी मोहाली, पंजाब)
२. रणजितसिंग पिता दर्शनसिंग (वय ५२, रा. गाव बहादरपूर फकिरा, जिल्हा पतियाळा, पंजाब)
हे दोन्ही आरोपी पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, प्राथमिक चौकशीत त्यांनी नाशिकमधील 'समृद्धी ज्वेलर्स'वर आपल्या इतर साथीदारांच्या मदतीने दरोडा टाकल्याची कबुली दिली आहे. पोलीस आता त्यांच्या इतर ४ फरार साथीदारांचा आणि लुटलेल्या मालाचा शोध घेत आहेत.

या कामगिरीत सहभागी असलेले पोलीस दल:
ही यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, डीसीपी किरणकुमार चव्हाण, डीसीपी मोनिका राऊत, डीसीपी किशोर काळे, एसीपी संदीप मिटके व शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल, युनिट २ चे प्रभारी सपोनि हेमंत तोडकर, पोउपनि चेतन श्रीवंत, अंमलदार प्रशांत मरकड, विशाल काठे, विशाल देवरे, नाझिमखान पठाण, मुक्तार शेख, कैलास चव्हाण, आप्पा पाळवदे, राम बर्डे, गोरक्ष साबळे आणि तांत्रिक विश्लेषण शाखेचे सपोनि/जया तारडे यांच्या संयुक्त पथकाने केली आहे.

Comments

No comments yet.