नाशिक विधान परिषद निवडणूक... असे आहे संख्याबळ आणि नियोजन...

Share:
Main Image
Last updated: 21-May-2026

 नाशिक, (प्रतिनिधी) २१ मे - महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे. भारत निवडणूक आयोगाने या निवडणुकीची अधिकृत घोषणा केली असून, सोमवारपासूनच (१८ मे) संपूर्ण नाशिक जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकीसाठी नाशिक जिल्ह्यात एकूण ९ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून, १८ जून रोजी मतदान तर २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी आयुष प्रसाद यांनी आज दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मधुमती सरदेसाई उपस्थित होत्या.

निवडणुकीचे सविस्तर वेळापत्रक:
तपशील कालावधी / दिनांक
अधिकृत अधिसूचना जारी करणे २५ मे २०२६ (सोमवार)
नामनिर्देशन (अर्ज) भरण्याचा अंतिम दिनांक ०१ जून २०२६ (सोमवार)
उमेदवारी अर्जांची छाननी ०२ जून २०२६ (मंगळवार)
उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिनांक ०४ जून २०२६ (गुरुवार)
मतदानाचा दिवस १८ जून २०२६ (गुरुवार) (सकाळी ८ ते दुपारी ४)
मतमोजणी आणि निकाल २२ जून २०२६ (सोमवार)
निवडणूक प्रक्रिया संपवण्याचा दिनांक २५ जून २०२६ (गुरुवार)

Advertisement

'हे' लोकप्रतिनिधी असणार मतदार; मतपत्रिकेद्वारे होणार मतदान
या निवडणुकीसाठी जिल्हा परिषद नाशिकचे सदस्य, नाशिक व मालेगाव महानगरपालिकेचे सदस्य, जिल्ह्यातील देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सदस्य तसेच मनमाड, येवला, नांदगाव, सटाणा, सिन्नर, इगतपुरी, भगूर, त्र्यंबकेश्वर, चांदवड, ओझर, पिंपळगाव बसवंत या नगरपरिषदा आणि दिंडोरी, कळवण, निफाड, देवळा, पेठ, सुरगाणा या नगरपंचायतींचे निर्वाचित सदस्य हेच मतदार (स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी) म्हणून आपला मतदानाचा हक्क बजावतील. ही निवडणूक मतपत्रिकेद्वारे (बॅलेट पेपर) होणार असून मतदारांना पसंतीक्रमानुसार मतदान करावे लागेल. यासाठी ‘जम्बो बॅलेट बॉक्स’ची व्यवस्था करण्यात आली आहे.

जिल्हाभरातील ९ मतदान केंद्रे आणि मतदार संख्या:
केंद्र क्र. केंद्राचे ठिकाण (तहसील कार्यालय) समाविष्ट मतदार क्षेत्र (कंसात मतदार संख्या)
१ नाशिक नाशिक मनपा सदस्य (१२२), भगूर नगरपरिषद (२३), देवळाली छावणी परिषद (१)
२ दिंडोरी दिंडोरी नगरपंचायत (१९), पेठ नगरपंचायत (१८)
३ इगतपुरी इगतपुरी नगरपरिषद (२४), त्र्यंबकेश्वर नगरपरिषद (२३)
४ निफाड निफाड नगरपंचायत (१९), पिंपळगाव बसवंत (२९), ओझर (३१), सिन्नर नगरपरिषद (३४)
५ येवला येवला नगरपरिषद (३०), नांदगाव नगरपरिषद (२३), मनमाड नगरपरिषद (३५)
६ मालेगाव मालेगाव महानगरपालिका सदस्य (८४)
७ चांदवड चांदवड नगरपरिषद (२३), देवळा नगरपंचायत (१८)
८ कळवण कळवण नगरपंचायत (१९), सुरगाणा नगरपंचायत (१९)
९ बागलाण सटाणा नगरपरिषद सदस्य (२८)

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या अटी व नियम:
पात्रता: निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवाराचे नाव महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही विधानसभा मतदारसंघात असणे बंधनकारक असून त्याची साक्षांकित प्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
अर्ज प्रक्रिया: उमेदवारांचे अर्ज जिल्हाधिकारी दालनात (पहिला मजला) २५ मे ते १ जून या काळात सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत स्वीकारले जातील.
अनामत रक्कम (डिपॉझिट): खुल्या प्रवर्गासाठी १०,०००/- रुपये, तर अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गासाठी ५,०००/- रुपये अनामत रक्कम राहील.
पोस्टरबाजी आणि विद्रुपीकरण केल्यास थेट जेल!
"प्रशासकीय परवानगीशिवाय खाजगी किंवा सार्वजनिक मालमत्तेवर पोस्टर लावणे, घोषणा किंवा चिन्ह लिहिणे, बॅनर आणि झेंडे लावण्यास 'महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ डिफेसमेंट ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट १९९५' नुसार सक्त बंदी आहे. याचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तीस ३ महिन्यांपर्यंत तुरुंगवास किंवा दोन हजार रुपयांपर्यंत दंड, अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. राजकीय पक्षांनी असे फलक तात्काळ स्वतःहून काढून घ्यावेत."
- आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी, नाशिक

Comments

No comments yet.