विनापरवानगी रस्ता खोदणे पडले महागात... नाशिक मनपाने केला एवढा दंड...

Share:
Main Image
Last updated: 21-May-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २१ मे - नाशिक महानगरपालिका क्षेत्रात नवीनच डांबरीकरण करण्यात आलेले रस्ते विनापरवानगी खोदून त्यांचे नुकसान करणाऱ्यांविरोधात महापालिका प्रशासनाने आता अत्यंत कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सातपूर विभागातील माऊलीनगर परिसरात पाण्याचे कनेक्शन घेण्यासाठी परवानगी न घेता डांबरी रस्ता फोडल्याप्रकरणी मनपाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित प्लंबरला तब्बल १८ हजार ९२४ रुपयांच्या दंडाची नोटीस बजावली आहे. हा दंड विहित मुदतीत मनपाच्या खजिन्यात न भरल्यास नियमानुसार फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असा कडक इशारा नोटीसमध्ये देण्यात आला आहे.

रस्ता क्रॉस करून बेकायदेशीर पाईपलाईन
मनपा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक ९ मधील माऊलीनगर, साईसिटी पार्क या परिसरात नुकतेच रस्त्याचे नवीन डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, या भागात एका घरासाठी पाण्याची पाईपलाईन जोडण्याकरिता महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता रस्ता थेट आडवा (क्रॉस) फोडण्यात आला आणि पाण्याचे पाईप टाकले गेले. हा प्रकार मनपाच्या बांधकाम विभागाच्या पाहणीदरम्यान निदर्शनास आला.

Advertisement

दंडाची आकडेवारी आणि हिशोब:
या बेकायदेशीर कृत्याबद्दल संशयित प्लंबर राजेंद्र कोंडू मंडळ (रा. श्रमिकनगर, सातपूर, नाशिक) याला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांच्या वतीने दंडात्मक नोटीस बजावण्यात आली आहे. दंडाची रक्कम खालीलप्रमाणे आकारण्यात आली आहे:
रोड डॅमेज चार्जेस (१० मीटर): ₹ १५,७७०/- (दुरुस्ती खर्च)
विनापरवानगी रस्ता फोडल्याबद्दल दंड (२०%): ₹ ३,१५४/-
एकूण दंडात्मक रक्कम: ₹ १८,९२४/- (अक्षरी रुपये अठरा हजार नऊशे चोवीस मात्र)

...तर थेट पोलीस ठाण्यात होणार रवानगी!
महापालिकेने स्पष्ट केले आहे की, हा रस्ता सार्वजनिक मालमत्ता असून तो विनापरवानगी फोडणे हा कायदेशीर गुन्हा आहे. त्यामुळे नोटीस मिळताच संबंधिताने हा दंड मनपाच्या खजिन्यात जमा करणे बंधनकारक आहे; अन्यथा पालिका प्रशासनाकडून संबंधित प्लंबरविरुद्ध शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल केला जाईल.

रस्ता तोडल्यास होणार फौजदारी कारवाई!
"शहरात पाणीपुरवठा, भुयारी गटार किंवा महावितरणच्या कामांसाठी नागरिकांनी किंवा ठेकेदारांनी विनापरवाना रस्ता तोडल्यास, त्यांच्यावर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कडक कार्यवाही केली जाईल. रस्त्यांचे नुकसान कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही."
- रवींद्र धारणकर, अधीक्षक अभियंता (पा.पु.) तथा प्र. शहर अभियंता, नाशिक मनपा

Comments

No comments yet.