नाशिक, (प्रतिनिधी) २० मे - शहरातील नर्सिंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये (नर्सिंग कॉलेज) भागीदारी करण्याचे आणि त्यातून मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून एका तरुणाला तब्बल २३ लाख रुपयांना गंडविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पैसे घेऊन दोन वर्षे उलटली तरी कुठेही नवीन व्यवसाय सुरू न करता फसवणूक केल्याप्रग्रणी गंगापूर पोलीस ठाण्यात संस्थाचालक सोमवंशी बंधूंसह त्यांच्या एका मित्राविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नर्सिंग कॉलेजच्या नफ्याचा हिशोब दाखवून जिंकला विश्वास
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल काशिनाथ पगारे (रा. रामेश्वरनगर, आनंदवली, नाशिक) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. संशयित आरोपी आणि तक्रारदार पगारे हे एकमेकांच्या परिचयाचे आहेत. संशयित सोमवंशी बंधूंच्या संस्थेच्या वतीने शहरात आणि वेगवेगळ्या भागात 'समृद्धी', 'उन्नती' आणि 'प्रगती' नर्सिंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट नावाचे नामांकित कॉलेजेस चालवले जातात.
सन २०२४ मध्ये संशयितांनी अमोल पगारे यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी आपल्या नर्सिंग इन्स्टिट्यूटचा ताळेबंद (Balance Sheet) आणि होत असलेला मोठा नफा याचा हिशोब दाखवून पगारे यांचा पूर्ण विश्वास संपादन केला.
व्यवसायवृद्धीच्या नावाखाली २३ लाख हडपले!
आपल्या या नर्सिंग पॅटर्नचा विस्तार करायचा असून त्यात भागीदारी (Partnership) केल्यास मोठा आर्थिक फायदा होईल, असे आमिष संशयितांनी पगारे यांना दाखवले. त्यांच्या भूलथापांना बळी पडून पगारे यांनी व्यवसायवृद्धीसाठी संशयितांना वेळोवेळी एकूण २३ लाख रुपये दिले.
दोन वर्षे फक्त टाळाटाळ: पैसे घेतल्यानंतर संशयितांनी दोन वर्षांचा काळ उलटूनही कुठेही नव्याने नर्सिंग इन्स्टिट्यूट किंवा व्यवसाय सुरू केला नाही.
अखेर पोलिसांत धाव: व्यवसाय तर सुरू झाला नाहीच, परंतु पगारे यांनी आपले पैसे परत मागितले असता संशयितांनी त्यांना वेगवेगळी कारणे सांगून टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पगारे यांनी गंगापूर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.
'या' संशयितांवर गुन्हा दाखल:
फिर्यादीवरून गंगापूर पोलिसांनी खालील तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे:
१. प्रकाश लहानू सोमवंशी
२. योगेश्वर भगवान सोमवंशी
३. गोकुळ नाना (संशयितांचा मित्र)
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे करीत असून, नामांकित शिक्षण संस्थेच्या नावाखाली आर्थिक फसवणूक करणाऱ्या या संशयितांची पोलीस आता चौकशी करत आहेत.