नीट पेपरफुटीतील आरोपी मोटेगावकरला दणका... RCC क्लास इमारतीवर बुलडोझर कारवाई...

Share:
Main Image
Last updated: 20-May-2026

पुणे, (प्रतिनिधी) २० मे - एरवी गंभीर गुन्ह्यातील आणि दंगलीतील आरोपींच्या बेकायदा मालमत्तांवर ‘बुलडोझर’ फिरवला जात असताना, देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लावणाऱ्या NEET पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपींवर अशी कारवाई का होत नाही? असा संतप्त सवाल गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरून विचारला जात होता. अखेर या संतापाची दखल घेत पुण्यामध्ये मोठी प्रशासकीय कारवाई झाली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणातील संशयित आरोपी शिवराज मोटेगावकर याच्या पुण्यातील प्रसिद्ध 'आरसीसी' (RCC) कोचिंग क्लासच्या शाखेवर पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाने आज बुलडोझर चालवला.

डेक्कन परिसरातील ज्या इमारतीमध्ये हा क्लास भरवला जात होता, त्या इमारतीचा काही भाग अनधिकृत आणि अतिक्रमण करून बांधण्यात आल्याचे सांगत पालिकेने तो भाग जमीनदोस्त केला. तसेच कोणतीही परवानगी न घेता हा क्लास सुरू केल्याप्रकरणी प्रशासनाने नोटीस बजावली आहे.

३ कोटी २० लाखांचा कर थकला; इमारतही सील!
अर्थात, पाडण्यात आलेली ही इमारत संशयित शिवराज मोटेगावकर यांच्या मालकीची नसून, त्यांनी क्लास चालवण्यासाठी ती भाड्याने घेतली होती. मात्र, या कारवाईच्या निमित्ताने इमारतीचा आणखी एक मोठा घोटाळा समोर आला आहे:
मालमत्ता कराची थकबाकी: या इमारतीचे मूळ मालक एम. पी. जोशी यांनी पुणे महानगरपालिकेचा तब्बल ३ कोटी २० लाख रुपयांचा मालमत्ता कर (Property Tax) थकवला आहे.
इमारतीला ठोकले सील: एवढी मोठी थकबाकी असल्याने अतिक्रमण पाडण्यासोबतच पालिकेच्या कर आकारणी विभागाने संपूर्ण इमारतीला टाळे ठोकून सील करण्याची जप्ती कारवाई केली आहे.

Advertisement

मनसेच्या इशाऱ्यानंतर पालिकेला आली जाग!
मोटेगावकर याच्या 'आरसीसी' क्लासच्या बेकायदा वापराबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) पुणे महापालिकेकडे लेखी तक्रार केली होती. "पेपरफुटी करून विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या आरोपींच्या अवैध व्यवसायांवर तात्काळ हातोडा पडला पाहिजे, अन्यथा मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन छेडले जाईल," असा थेट इशारा मनसेने प्रशासनाला दिला होता. मनसेच्या या आक्रमक पवित्र्यानंतर आणि तक्रारीची दखल घेत पालिकेने तातडीने पोलीस बंदोबस्तात ही मोठी कारवाई पूर्ण केली.

सोशल मीडियावरील 'त्या' प्रश्नाला उत्तर!
उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही गुन्हेगारांवर बुलडोझर कारवाईची मागणी सातत्याने होत असते. नीट घोटाळा उघडकीस आल्यापासून मोटेगावकरच्या लातूर, छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यातील क्लासेसवर कारवाईची मागणी होत होती. आज पुण्यात झालेल्या या कारवाईमुळे पेपरफुटी प्रकरणातील आरोपींची प्रशासकीय कोंडी करण्यास सुरुवात झाल्याचे बोलले जात आहे.

?s=20

Comments

No comments yet.