नाशिक, (प्रतिनिधी) १९ मे - सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात येणाऱ्या कोट्यवधी भाविकांना सुलभ, सुरक्षित आणि विनाअडथळा मार्गदर्शन मिळावे, यासाठी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने आतापासूनच वैज्ञानिक आणि जागतिक दर्जाच्या नियोजनाला सुरुवात केली आहे. कुंभमेळ्यादरम्यान गर्दीचे व्यवस्थापन आणि वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची 'साईनेज आणि वे-फाइंडिंग' (दिशादर्शक व मार्गशोधन) प्रणाली विकसित केली जाणार आहे. या संदर्भातील एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन सोमवारी कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथे करण्यात आले होते. या बैठकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, सिडनी ऑलिम्पिकसह जगातील विविध ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये दिशादर्शक आणि नेव्हिगेशन प्रणालीवर काम केलेले ऑस्ट्रेलियाचे आंतरराष्ट्रीय वे-फाइंडिंग तज्ज्ञ मार्क रॉस यांनी या बैठकीत उपस्थित राहून प्रशासनाला विशेष मार्गदर्शन केले.
'भाविकांना कोणालाही रस्ता विचारावा लागू नये!'
बैठकीत दिशादर्शक फलकांच्या रचनेबाबत भूमिका मांडताना कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह म्हणाले, "कुंभमेळ्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांना कोणालाही रस्त्यासाठी किंवा विशिष्ट ठिकाणासाठी कोणाला विचारावे लागू नये, इतकी स्पष्ट आणि सहज समजणारी व्यवस्था आपल्याला उभी करायची आहे. संपूर्ण वे-फाइंडिंग प्रणाली ही सोपी, बहुभाषिक आणि पहिल्यांदाच नाशिकमध्ये येणाऱ्या भाविकालाही सहज समजेल अशी असेल."
प्रयागराज महाकुंभ आणि २०१५ च्या सिंहस्थाचा अभ्यास
या उच्चस्तरीय बैठकीत २०१५ मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यात वापरण्यात आलेल्या दिशादर्शक व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. तसेच नुकत्याच पार पडलेल्या प्रयागराज महाकुंभ आणि जगातील इतर मोठ्या धार्मिक व आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमधील यशस्वी गर्दी व्यवस्थापन आणि ट्रॅफिक साखळीचा अभ्यास करण्यात आला.
बैठकीत 'या' प्रमुख मुद्द्यांवर झाली सविस्तर चर्चा:
स्थायी आणि अस्थायी फलक: कुंभमेळ्यापुरते तात्पुरते आणि नंतरही शहरात कायम राहणारे बहुभाषिक दिशादर्शक फलक लावणे.
प्रमाणित डिझाईन (Standardized Design): संपूर्ण शहरात फलकांचा रंग, फॉन्ट आणि आकार एकाच पद्धतीचा असणार, जेणेकरून गोंधळ उडणार नाही.
महत्त्वाच्या ठिकाणांचे लिंकिंग: शहरात प्रवेश करणाऱ्या मुख्य रस्त्यांपासून ते पार्किंग झोन, विविध शाही घाट, मंदिरे, रेल्वे-बस स्थानके आणि सार्वजनिक सुविधा केंद्र (अन्नछत्र, वैद्यकीय छावणी) यांपर्यंत अचूक नेव्हिगेशन करणे.
पुढील आठवड्यात संयुक्त पाहणी दौरा
या आंतरराष्ट्रीय स्तरावरील नियोजनाविरुद्ध केवळ कागदावर आराखडा न ठेवता, प्रत्यक्ष जमिनीवर काम सुरू केले जाणार आहे. येत्या आठवड्यात कुंभमेळा प्राधिकरण, पोलीस विभाग, महानगरपालिका, अभियांत्रिकी विभाग आणि तांत्रिक पथके नाशिक व त्र्यंबकेश्वर परिसराचा संयुक्त पाहणी दौरा करणार आहेत. या दौऱ्यात महत्त्वाच्या ठिकाणांची (Hotspots) पाहणी करून दिशादर्शक व्यवस्थेचा अंतिम आराखडा निश्चित केला जाईल.
बैठकीला लाभलेली उच्चस्तरीय उपस्थिती:
या बैठकीस नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अतिरिक्त कुंभमेळा आयुक्त कमलाकर रणदिवे, शहर पोलीस उपायुक्त किरण चव्हाण, मनपा अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, एएसआयचे (राज्य) सहाय्यक संचालक अमोल गोटे, शिर्डी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे, ग्राफिक्स बियाँडचे सह-संस्थापक बारिश दाते, पीडब्ल्यूडीचे कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, प्राधिकरणाचे मुख्याधिकारी अमोल चौधरी आणि जलसंपदा विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
?s=20