येवला शहरातील पाणी टंचाई होणार दूर... मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन...

Share:
Main Image
Last updated: 19-May-2026

येवला, (प्रतिनिधी) १९ मे - येवला शहरातील संभाव्य पाणी टंचाईची गंभीर दखल घेत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आढावा घेत तातडीने पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यांच्या सूचनेनुसार येवला नगरपालिकेच्या वतीने दि. ६ मे २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय व जलसंपदा विभागाकडे आवर्तन सोडण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला होता. या पाठपुराव्यानंतर जलसंपदा विभागाच्या वतीने पालखेड कालव्यातून येवला शहरासाठी पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले असून त्यामुळे शहरातील साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरले जात आहेत. परिणामी येवला शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यास मोठी मदत होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी यांनी दिली.

यंदा अल निनोच्या प्रभावामुळे राज्यात पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य शासनाकडून पाण्याचे योग्य नियोजन व काटकसरीने वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार येवला शहरातही उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्यात येत असून जून महिन्यापर्यंत नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी नगरपालिका प्रशासन प्रयत्नशील असल्याचे नगराध्यक्ष लोणारी यांनी सांगितले.

शहरातील नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करताना त्यांनी सांगितले की, उपलब्ध पाणीसाठ्याचा विनाकारण अपव्यय टाळल्यास आगामी काळात पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यास मदत होईल. तसेच पाणीपुरवठा व्यवस्थेवर नगरपालिका प्रशासन सतत लक्ष ठेवून असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

प्रतिक्रिया...

मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून येवला शहराच्या पाणीप्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. नागरिकांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी त्रास होऊ नये, यासाठी शासनस्तरावर तातडीने निर्णय घेण्यात आला. येवला शहरातील प्रत्येक नागरिकाला नियमित पाणीपुरवठा मिळावा यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. नागरिकांनी पाण्याचा अपव्यय होऊ न देता पाणी जपून वापरावे.

माजी खासदार समीर भुजबळ

Comments

No comments yet.