गंगापूरच्या विकासकामांवरून नाशिकमध्ये रंगले 'निष्ठा विरुद्ध मैत्री'चे राजकारण... उपमहापौरांच्या कार्यक्रमात खासदार राजाभाऊ वाजे भाव खाऊन गेले...

Share:
Main Image
Last updated: 19-May-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १९ मे - गंगापूर परिसराच्या विकासाला नवी दिशा देणारी विविध लोकाभिमुख विकासकामे नागरिकांच्या सेवेत दाखल झाली. नाशिकचे उपमहापौर विलास शिंदे यांच्या विशेष प्रयत्नांतून साकारलेल्या भव्य 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान', आधुनिक 'भाजी मार्केट' आणि सुसज्ज 'सभागृहाचा' लोकार्पण सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला. शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा झाला. या कार्यक्रमाला सत्ताधारी महायुतीचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते; मात्र संपूर्ण सोहळ्यात सर्वाधिक चर्चा रंगली ती उद्धव ठाकरे गटाचे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या व्यासपीठावरील उपस्थितीची आणि त्यांच्या प्रतिक्रियेची!

उद्यानासह आधुनिक भाजी मार्केट व सभागृह नागरिकांच्या सेवेत

विलास शिंदे यांच्या प्रभागात कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पांमुळे गंगापूर परिसराचा चेहरामोहरा बदलणार आहे:

भव्य उद्यान: ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांसाठी स्वच्छ, सुरक्षित आणि आधुनिक विरंगुळ्याचे केंद्र उपलब्ध झाले आहे.

आधुनिक भाजी मार्केट: शेतकरी, भाजी विक्रेते आणि ग्राहकांसाठी सुसज्ज व नियोजनबद्ध जागा निर्माण करण्यात आली असून, यामुळे स्थानिक व्यापाराला मोठी चालना मिळेल.

सुसज्ज सभागृह: विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांसाठी नागरिकांना आता हक्काचे आधुनिक व्यासपीठ मिळाले आहे.

शिवसेनेत फूट, पण निधी आणि मैत्रीची चर्चा

Advertisement

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर खासदार राजाभाऊ वाजे हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ राहिले, तर नाशिकचे उपमहापौर विलास शिंदे आणि मंत्री दादा भुसे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत. असे असतानाही वाजे यांनी दिलेल्या निधीची नाशिकच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली.

याबाबत स्वतः खासदार राजाभाऊ वाजे यांनी अत्यंत जाहीर आणि सडेतोड प्रतिक्रिया देत सर्व चर्चांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले,

"दादा भुसे जेव्हा पालकमंत्री होते, तेव्हा त्यांनी मला काही निधी दिला होता. त्या निधीतील काही हिस्सा मी आमचे तत्कालीन महानगरप्रमुख तथा माझे स्नेही विलास अण्णा शिंदे यांच्या प्रभागातील विकासकामांसाठी दिला होता. या निधीतून झालेल्या विकासकामांचे आज उद्घाटन असल्याने विलास अण्णांनी मला हक्काने आमंत्रित केले."

"माझी भूमिका फक्त वाढप्याची, श्रेय अण्णांचेच; विचारांशी ठाम!"

व्यासपीठावरील राजकीय उपस्थितीबाबत कोणतेही गैरसमज निर्माण होऊ नयेत, यासाठी खासदार वाजेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, "या विकासकामांमध्ये माझे काम फक्त 'वाढप्या'सारखे होते, मी केवळ निधी वाढला (दिला). त्यामुळे या सर्व कामांचे खरे श्रेय विलास अण्णांचेच आहे. राहिली गोष्ट राजकारणाची, तर मी माझ्या विचारांशी आणि पक्षाशी कायम एकनिष्ठ आणि ठाम आहे. त्यामुळे माझ्या उपस्थितीवरून कोणीही कोणताही राजकीय गैरसमज करून घेऊ नये." त्यांच्या या विधानाने राजकीय मंचावर मैत्री आणि कर्तव्य जपतानाच पक्षाप्रती असलेली निष्ठाही त्यांनी ठळकपणे अधोरेखित केली.

दिग्गज नेत्यांची जंगी उपस्थिती

या हाय-व्होल्टेज लोकार्पण सोहळ्याला राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुहास कांदे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, उपनेते अजय बोरस्ते, विजय करंजकर, माजी खासदार आनंद परांजपे, माजी महापौर दशरथ पाटील, जिल्हा संघटक योगेश म्हस्के, महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह नाशिकमधील स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

?s=20

Comments

No comments yet.