भाजपवासी ​खासदार राघव चड्ढा शिर्डीत... ‘आप’ला सोडचिठ्ठी दिल्यानंतर प्रथमच साईचरणी... दर्शनानंतर म्हणाले...

Share:
Main Image
Last updated: 18-May-2026

शिर्डी, (प्रतिनिधी) १८ मे - आम आदमी पक्षाला (AAP) रामराम ठोकून नुकताच भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केलेले राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी आज शिर्डीत येऊन श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यांनी साईबाबांच्या दुपारच्या धूप आरतीलाही विशेष उपस्थिती लावली. दर्शन घेतल्यानंतर चड्ढा यांनी पत्रकारांशी बोलताना, "बाबा छप्पर फाडके देते है," अशी सूचक भावना व्यक्त केली. त्यांच्या या शिर्डी दौऱ्यामुळे आणि विधानामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी खासदार राघव चड्ढा यांचा शाल आणि श्री साईबाबांची मूर्ती देऊन रीतसर सत्कार केला.

पंजाब निवडणुकीच्या तोंडावर 'चड्ढा' भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार?

राघव चड्ढा यांचा भाजप प्रवेश आणि त्यानंतरचा हा शिर्डी दौरा आगामी राजकीय समीकरणांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. येत्या काही महिन्यांत पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप पंजाबमध्ये राघव चड्ढा यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून मैदानात उतरवण्याची दाट शक्यता आहे. चड्ढा यांच्या तरुण, अभ्यासू आणि आक्रमक प्रतिमेचा फायदा पंजाबमध्ये भाजपला आपले पाय रोवण्यासाठी होऊ शकतो.

Advertisement

केजरीवाल आणि मान सरकारला कोंडीत पकडण्याची रणनीती

राघव चड्ढा हे एकेकाळी अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाचे मुख्य रणनीतीकार म्हणून ओळखले जात होते. पंजाबमध्ये 'आप'चे सरकार आणण्यात त्यांचा मोठा वाटा होता. मात्र, आता त्यांनीच भाजपची कास धरल्यामुळे अरविंद केजरीवाल, 'आप' आणि पंजाबमधील भगवंतसिंग मान सरकारसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

राघव चड्ढा यांच्या माध्यमातून भाजप पंजाबमध्ये 'आप'ला अंतर्गत पातळीवर मोठे खिंडार पाडण्याच्या तयारीत असून, आगामी निवडणुकीत मान सरकारला थेट शह देण्याची रणनीती आखली जात असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

Comments

No comments yet.