आईसह तीन सख्ख्या बहिणींवर अत्याचार... भोंदू सुफी अब्दुल अजीज बाबा... नाशिक कोर्टाने दिला हा निकाल...

Share:
Main Image
Last updated: 18-May-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १८ मे - जादूटोणा उतरवण्याच्या आणि विवाह जमवून देण्याच्या बहाण्याने एकाच कुटुंबातील आई आणि तिच्या तीन सख्ख्या मुलींवर (ज्यात एका अल्पवयीन बहिणीचा समावेश आहे) अडीच वर्षे नराधम अत्याचार करणाऱ्या भोंदू सुफी अब्दुल अजीज बाबा याला नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने 'मरेपर्यंत आजन्म कारावासाची' (Austerity Life Imprisonment) कठोर शिक्षा ठोठावली आहे. न्यायाधीश प्रीती घुले यांनी हा ऐतिहासिक निकाल दिला असून, संशयिताला तब्बल ४ लाख ७५ हजार रुपयांचा आर्थिक दंडही ठोठावला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) पाठपुराव्यामुळे आणि कायदेशीर मदतीमुळे पीडित कुटुंबाला हा न्याय मिळाला असून, राज्यातील भोंदूगिरीच्या इतिहासातील ही सर्वात मोठी आणि कौतुकास्पद शिक्षा मानली जात आहे.

अंगावर काटा आणणारा येवल्यातील भयंकर प्रकार

हा संपूर्ण धक्कादायक प्रकार १७ एप्रिल २०१९ ते ३ ऑगस्ट २०२१ या अडीच वर्षांच्या कालावधीत येवला येथे घडला. एका तरुणीचा विवाह जमत नसल्याने तिचे कुटुंब या भोंदू सुफी अब्दुल अजीज बाबाकडे गेले होते. तुझ्यावर जादूटोणा झाला आहे, असे सांगत भोंदूने पीडितेच्या घरी पूजेचा बहाणा केला. पूजा करताना त्याने पीडितेची आई आणि दोन्ही बहिणींना घराबाहेर जाण्यास सांगितले.

गुंगीचे औषध, अनैसर्गिक अत्याचार अन् अश्लील चित्रीकरण!

घरात कोणी नसल्याचा फायदा घेऊन भोंदूने तरुणीला गुलाब पाण्यातून गुंगीचे औषध दिले. तरुणी बेशुद्ध झाल्यानंतर त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडिता शुद्धीवर आल्यानंतर तिच्या हा प्रकार लक्षात आला. तिने विरोध केला असता नराधम भोंदूने चाकूचा धाक दाखवून तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला आणि त्याचे मोबाईलमध्ये अश्लील चित्रीकरण केले.

ब्लॅकमेल करून संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त केले; आईवरही अत्याचार

ते अश्लील चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत भोंदूने पीडितेवर वारंवार अत्याचार सुरू ठेवले. या त्रासाला कंटाळून पीडितेने आपल्या आई आणि बहिणींना सर्व हकीकत सांगितली. जेव्हा पीडितेची आई या भोंदूला जाब विचारण्यासाठी गेली, तेव्हा त्याने आईलाही ब्लॅकमेल करत तिच्यावरही अत्याचार केला. एवढेच नव्हे तर, या नराधमाने पीडितेच्या इतर दोन्ही सख्ख्या बहिणींनाही आपल्या वासनेची शिकार बनवले. या दरम्यान त्याने पीडित कुटुंबाचे ८ लाख रुपयांचे आर्थिक शोषण केले, तसेच त्यांच्यावर धर्मांतर करण्यासाठीही दबाव आणला होता.

'अंनिस' मैदानात; 'पोक्सो' आणि जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा

Advertisement

पीडित कुटुंबातील एका बहिणीचे वय अवघे १७ वर्षे (अल्पवयीन) असल्याने या प्रकरणात अत्यंत गंभीर वळण आले. महाराष्ट्र 'अंनिस'च्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत पीडित कुटुंबाला धीर दिला आणि त्यांच्या प्रयत्नातून येवला पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

तपास: तत्कालीन पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत सखोल तपास करून ठोस पुरावे गोळा केले.

न्यायालयीन लढाई: हा खटला येवला ऐवजी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात चालवण्यात आला. सरकारी वकील किरण भेंडभर आणि अतिरिक्त सरकारी वकील लीना सुमन चंद्रकांत चव्हाण यांनी पीडितांची बाजू अत्यंत भक्कमपणे न्यायालयात मांडली.

सह-आरोपीची मुक्तता: दुसरा संशयित आरोपी जब्बार शेख याला पुराव्याअभावी न्यायालयाने दोषमुक्त केले आहे.

भोंदूगिरीला कायद्याचा कडक चाप बसेल: 'अंनिस'

नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाच्या या कडक आणि ऐतिहासिक आदेशाचे महाराष्ट्र 'अंनिस'ने जाहीर स्वागत केले आहे. 'अंनिस'चे राज्य कार्यवाह डॉ. टी. आर. गोराणे, कृष्णा चांदगुडे आणि अर्जुन कोकाटे यांनी सांगितले की,

"नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील भोंदूगिरीच्या विरोधातील लढ्यातील ही ऐतिहासिक केस आहे. न्यायालयाच्या अशा कठोर निर्णयामुळे समाजात भोंदूगिरी करणाऱ्यांमध्ये कायद्याचा मोठा धाक निर्माण होईल आणि अशा विकृत प्रवृत्तींना निश्चितच चाप बसेल."

कृष्णा चांदगुडे, राज्य कार्यवाह, अंनिस

Comments

No comments yet.