नाशिक, (प्रतिनिधी) १८ मे - सावत्र बापाने पाच वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नाशिकमधील म्हसरूळ परिसरातून समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट पसरली असून, पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या काही तासांत संशयित नराधमाच्या सिनेस्टाईल मुसक्या आवळल्या आहेत.
नेमकी घटना काय?
अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव धानुअली मोहम्मद शेख उर्फ आर्यन (वय ३०, मूळ रा. बिहार, सध्या रा. अश्वमेधनगर, पेठरोड) असे आहे. संशयिताने पीडित मुलीच्या आईशी विवाह केला होता आणि मायलेकींचा सांभाळ करण्याची जबाबदारी घेतली होती. मात्र, त्याने या नात्याला काळे फासले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. १७) दुपारच्या सुमारास संशयित नराधम आपल्या घरातच होता. मुलगी घरात असताना, तो तिच्याशी अश्लील चाळे करत होता. त्याच वेळी मुलीची आई स्वयंपाकघरातून अचानक बेडरूममध्ये आली असता, तिला हा प्रकार निदर्शनास आला. आईला पाहताच संशयिताने तिथून पळ काढला.
पोलिसांची धडक कारवाई
घटनेची माहिती मिळताच पीडित मुलीच्या आईने तत्काळ म्हसरूळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून संशयितावर पोक्सो (POCSO) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. गुन्ह्यानंतर संशयित फरार झाला होता. मात्र, पोलीस उपनिरीक्षक मनोहर क्षिरसागर आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे वडाळागाव परिसरात सापळा रचला. पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून नराधम बापास जेरबंद केले.
या धक्कादायक प्रकरणाचा अधिक तपास उपनिरीक्षक मनोहर क्षिरसागर करत आहेत. या घटनेमुळे सुरक्षेच्या दृष्टीने पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
जातीवाचक शिवीगाळ
नाशिक : मुलास जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी त्याच्या आईने पोलीसात धाव घेतली आहे. भरधाव वेगात वाहन चालवितो या कारणातून एकाने मुलास शिवीगाळ व मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सलीम शेख (रा.भारती कॉम्प्लेक्सखाली, गोसावी वाडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहेत. रविवारी (दि.१७) सायंकाळी हा प्रकार घडला. संशयिताने भारती कॉम्प्लेक्स भागात तक्रारदार महिलेच्या मुलाची वाट अडवित त्यास जोरात वाहन चालविण्याबाबत जाब विचारला. यावळी संशयिताने मुलास मारहाण करीत जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप महिलेने आपल्या फिर्यादीत केला आहे. सहाय्यक आयुक्त सचिन बारी तपास करीत आहेत.