औषध विक्रेत्यांचा २० मेला 'बंद'... अत्यावश्यक औषधे कशी मिळणार? अन्न व औषध प्रशासन म्हणते...

Share:
Main Image
Last updated: 18-May-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १८ मे - अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने आपल्या विविध प्रलंबित मागण्यांच्या निषेधार्थ आगामी बुधवारी (२० मे २०२६) देशव्यापी व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर, नाशिक शहर आणि जिल्ह्यातील रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून नागरिकांनी आवश्यक औषधे आणि वैद्यकीय साहित्याची आगाऊ खरेदी करून ठेवावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) नाशिक विभागाचे सहआयुक्त (औषधे) अ. तु. बर्डे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. प्रशासनाने नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता व संयम राखण्याचे आवाहन केले आहे.

शासकीय रुग्णालये आणि आपत्कालीन सेवा सुरू राहणार

या संपामुळे जिल्ह्यातील बहुतांश खाजगी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, रुग्णांचे हाल होऊ नयेत यासाठी शासकीय रुग्णालये, आपत्कालीन वैद्यकीय सेवा आणि काही निवडक औषध दुकाने या काळात सुरू राहतील, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

केमिस्ट बांधवांनी बंदमध्ये सहभागी होऊ नये: एफडीए

सहआयुक्त बर्डे यांनी औषध दुकानदारांना देखील आवाहन केले आहे की, औषध दुकानदारांना मिळणारे परवाने हे 'औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४०' अंतर्गत अटी व नियमांच्या अधीन राहून मंजूर करण्यात आलेले असतात. रुग्णांना वेळेवर औषधे उपलब्ध करून देणे हे केमिस्टचे मुख्य कर्तव्य आहे.

बंदच्या काळात औषधांचा कृत्रिम तुटवडा निर्माण होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. कायदा व सुव्यवस्था तसेच लागू कायदे व आदेशांची अंमलबजावणी प्रशासनाकडून काटेकोरपणे केली जाणार असल्याने सर्व केमिस्ट बांधवांनी या बंदमध्ये सहभागी होऊ नये, असे स्पष्ट आवाहनही प्रशासनाने केले आहे.

नागरिकांसाठी हेल्पलाईन: अडचण आल्यास 'या' अधिकाऱ्यांशी संपर्क साधा!

Advertisement

बंदच्या काळात जर एखाद्या रुग्णाला तातडीने औषध उपलब्ध झाले नाही किंवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली, तर नाशिक जिल्ह्यातील नागरिकांसाठी प्रशासनाने खालील संपर्क क्रमांक जाहीर केले आहेत:

 सु. सा. देशमुख (सहाय्यक आयुक्त, औषधे)

दूरध्वनी: ०२५३-२३५१२०१/०२ | भ्रमणध्वनी: ९८५०१७७८५३

चं. अ. मोरे (सहाय्यक आयुक्त, औषधे)

दूरध्वनी: ०२५३-२३५१२०१/०२ | भ्रमणध्वनी: ९७६६८११२७९

म. वि. देशपांडे (सहाय्यक आयुक्त, औषधे)

दूरध्वनी: ०२५३-२३५१२०१/०२ | भ्रमणध्वनी: ८४१२८०३५०७

Comments

No comments yet.