“आपले आरोग्य… आमची जबाबदारी”... येवला-लासलगाव मतदारसंघासाठी ‘वैद्यकीय मदत कक्ष’ सुरू... समीर भुजबळ यांचा पुढाकार...

Share:
Main Image
Last updated: 17-May-2026

येवला, (प्रतिनिधी) १७ मे - येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातील एकही नागरिक वैद्यकीय सेवेपासून वंचित राहू नये, या उद्देशाने माजी खासदार समीर भुजबळ यांच्या पुढाकारातून आज येवला येथील कार्यालयात “वैद्यकीय मदत कक्ष” या लोकहिताच्या महत्त्वपूर्ण उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेला हा उपक्रम गरजू, गरीब आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठा आधार ठरणार असून“वैद्यकीय मदत कक्ष” हा केवळ एक उपक्रम नसून जनतेच्या आरोग्याची जबाबदारी स्वीकारणारा सेवाभावाचा संकल्प असल्याचे प्रतिपादन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले.

आज अनेक रुग्णांना योग्य उपचार, सरकारी योजनांची माहिती, आर्थिक मदत तसेच रुग्णालयांमध्ये योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने हा मदत कक्ष येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेसाठी आशेचा किरण ठरणार आहे.

या कक्षाच्या माध्यमातून रुग्ण मार्गदर्शन, मुख्यमंत्री सहायता निधी केंद्र, विविध शासकीय योजनांची माहिती व मदत, पॅलिएटिव्ह केअर सेवा, मोफत आरोग्य शिबिरे, औषध मदत तसेच आयुष्मान भारत योजनेंतर्गत सहाय्य अशा विविध सुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. “आपले आरोग्य… आमची जबाबदारी!” हा संदेश प्रत्यक्षात उतरवत ही सेवा २४ तास सुरू राहणार आहे.

या उपक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे  संतोषजी खैरनार यांची वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या नेतृत्वाखाली हा कक्ष कार्यरत राहणार आहे. तसेच आजपासून संपर्क कार्यालय येथे आयुष्मान भारत हेल्थ कार्ड नोंदणीसाठी विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.

Advertisement

राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या या योजनेंतर्गत पात्र रुग्णांना पाच लाख रुपयांपर्यंत वैद्यकीय मदत मिळणार आहे. यासाठी आवश्यक असलेली बायोमेट्रिक मशिन्स देखील उपलब्ध करून देण्यात आली आहेत. आगामी काळात ही सुविधा सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये सुरू होणार असल्याचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी सांगितले.

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ पुढे म्हणाले की, जनतेच्या दुःखात उभे राहणे, संकटात मदतीचा हात देणे आणि गरजूंच्या चेहऱ्यावर दिलासा निर्माण करणे हेच खरे लोकसेवेचे कार्य आहे. मंत्री छगन भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली हे कार्य सातत्याने सुरू असून पुढेही सुरू राहील,” असेही त्यांनी नमूद केले.

तसेच आपल्याला किंवा आपल्या परिसरातील कुणालाही आरोग्यविषयक मदतीची आवश्यकता भासल्यास वैद्यकीय मदत कक्षाशी त्वरित संपर्क साधावा. या माध्यमातून गरजू रुग्णांना नवी आशा, नवे जीवन आणि योग्य उपचार मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न राहील असे माजी खासदार समीर भुजबळ यांनी सांगितले.

यावेळी प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, शहराध्यक्ष दत्ता निकम, वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख  संतोष खैरनार,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. तारुर यांच्यासह येवला नगरपालिकेचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.

Comments

No comments yet.