राज्य पोलीस दलात मोठे फेरबदल... वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नत्या...

Share:
Main Image
Last updated: 17-May-2026

मुंबई, (प्रतिनिधी) १७ मे - राज्य गृह विभागाने शुक्रवारी एक मोठा निर्णय घेत राज्यातील वरिष्ठ भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नतीचे (Promotions) आदेश जारी केले आहेत. यामध्ये अनेक कार्यक्षम आणि धडक कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना पदोन्नती देत महत्त्वाच्या पदांवर नियुक्त करण्यात आले आहे. मुंबई, पुणे, अमरावती आणि गडचिरोलीसह राज्यातील विविध विभागांतील एकूण १० वरिष्ठ अधिकाऱ्यांचा या आदेशात समावेश आहे.

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम २२न मधील तरतुदींनुसार हे आदेश निर्गमित करण्यात आले असून, शासनाचे सहसचिव सुग्रिव धपाटे यांच्या स्वाक्षरीने हे आदेश काढण्यात आले आहेत. सर्व संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित आपल्या नवीन पदांचा पदभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या बदल्या आणि पदोन्नत्या एका दृष्टिक्षेपात:
मोक्षदा पाटील : यांची राज्य राखीव पोलीस बल (SRPF, मुंबई) येथून बृहन्मुंबईच्या अपर पोलीस आयुक्तपदी (Addl. CP) बदली करण्यात आली आहे.
तेजस्वी सातपुते : पुणे राज्य राखीव पोलीस दलाच्या (गट क्र. १) समादेशक (Commandant) पदावरून त्यांना पदोन्नती मिळाली असून, त्यांची पुणे शहर अपर पोलीस आयुक्त (गुन्हे - Crime) पदी नियुक्ती झाली आहे.
राकेश ओला : अमरावतीचे पोलीस अधीक्षक (SP) म्हणून कार्यरत असणाऱ्या ओला यांना आता पदोन्नती देऊन अमरावतीच्या पोलीस आयुक्त (CP) पदाची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
प्रियांका नारनवरे : मुंबई वाहतूक विभागाच्या अपर पोलीस आयुक्त पदावरून त्यांची बदली महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC) मुख्य दक्षता अधिकारी (पोलीस उपमहानिरीक्षक - DIG) पदी करण्यात आली आहे.
अशोक दुधे : राज्य गुप्तवार्ता विभागाचे (SID) उपायुक्त असलेल्या दुधे यांना पदोन्नती देऊन राज्य राखीव पोलीस बल, मुंबईच्या पोलीस उपमहानिरीक्षक (DIG) पदी नियुक्ती देण्यात आली आहे.

Advertisement

मुंबईत तीन 'DCP'ना पदोन्नतीची लॉटरी!
बृहन्मुंबई पोलीस दलातील तीन पोलीस उपायुक्तांना (DCP) पदोन्नतीची लॉटरी लागली आहे. यामध्ये दीक्षित गेडाम, कृष्णकांत उपाध्याय आणि प्रविण मुंडे या तिन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना बृहन्मुंबईतच 'अपर पोलीस आयुक्त' (Addl. CP) म्हणून पदोन्नतीने नियुक्त करण्यात आले आहे. या तिघांनाही मुंबईचा दांडगा अनुभव असल्याने त्यांच्या नियुक्तीने मुंबई पोलीस दलाला अधिक बळकटी मिळणार आहे.

गडचिरोली अन् 'सीआयडी'तही नियुक्त्या
नक्षलग्रस्त आणि संवेदनशील भाग असलेल्या गडचिरोलीचे प्रभारी पोलीस उपमहानिरीक्षक योगेश गुप्ता यांना आता त्याच पदावर नियमित पदोन्नती देण्यात आली आहे. यासोबतच, पुणे गुन्हे अन्वेषण विभागाचे (CID) पोलीस अधीक्षक एम.सी.व्ही. महेश्वर रेड्डी यांना पदोन्नती देऊन त्यांची याच विभागाच्या (CID) पोलीस उपमहानिरीक्षक (DIG) पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

या मोठ्या फेरबदलांमुळे राज्यातील पोलीस दलाच्या वरिष्ठ स्तरात मोठी उलथापालथ झाली असून, कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने गृह विभागाने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.

Comments

No comments yet.