वैद्यकीय क्षेत्रातील चमत्कार... महिलेच्या छातीत सरकले यकृत... १० तासांच्या शस्त्रक्रियेनंतर...

Share:
Main Image
Last updated: 17-May-2026

मुंबई, (विशेष प्रतिनिधी) १७ मे - जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या डॉक्टरांनी एका ३२ वर्षीय महिलेवर अत्यंत गुंतागुंतीची आणि दुर्मिळ अशा 'डायफ्रामॅटिक हर्निया'वर (Diaphragmatic Hernia) यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. या आजारामुळे संबंधित महिलेचे यकृत, लहान व मोठे आतडे पोटाच्या भागातून सरकून थेट छातीच्या पोकळीत विस्थापित झाले होते, ज्यामुळे त्यांना श्वास घेणेही कठीण झाले होते.

भारतातील पहिलेच दुर्मिळ प्रकरण
शेख यांना वयाच्या १२ व्या वर्षी झालेल्या दुखापतीमुळे हा त्रास उद्भवल्याचे सांगण्यात येते. त्यांच्या श्वासपटलाला (Diaphragm) तब्बल २० सेंमी मोठे छिद्र पडले होते, ज्यातून संपूर्ण यकृतच छातीत सरकले होते. जगभरात अशा प्रकारची आजवर केवळ १७३ प्रकरणे नोंदवली गेली असून, भारतातील प्रौढ व्यक्तीमधील २० सेंमी आकाराच्या दोषावर झालेली ही पहिलीच यशस्वी शस्त्रक्रिया असल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे.

Advertisement

१० तासांचा शस्त्रक्रिया थरार
डॉ. विमेश राजपूत (थोरॅसिक सर्जन) आणि डॉ. निलेश डॉक्टर (गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट) यांच्या नेतृत्वाखालील टीमने ही १० तासांची प्रदीर्घ शस्त्रक्रिया पार पाडली.
जटिलता: यकृत आणि फुफ्फुस एकमेकांना घट्ट चिकटलेले असल्याने डॉक्टरांना लॅप्रोस्कोपिकऐवजी 'ओपन सर्जरी'चा मार्ग स्वीकारावा लागला.
अद्ययावत तंत्रज्ञान: 'व्हिडिओ असिस्टेड थोरॅस्कोपिक' तंत्राचा वापर करून आणि दोन पदरी जाळी (Mesh) बसवून विस्थापित अवयव पुन्हा मूळ जागी स्थापित करण्यात आले.
धोका निवारण: पोटातील दाब अचानक वाढून 'अ‍ॅबडॉमिनल कम्पार्टमेंट सिंड्रोम' होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेण्यात आली.

मृत्यूच्या दाढेतून यशस्वी पुनरागमन
शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची स्थिती नाजूक असल्याने त्यांना ९ दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. यादरम्यान त्यांना न्यूमोथोरॅक्स आणि जंतूसंसर्गाचा सामना करावा लागला. मात्र, प्रगत औषधोपचार आणि श्वसन पुनर्वसनामुळे (Respiratory Rehab) अवघ्या २२ दिवसांत त्यांची प्रकृती आश्चर्यकारक रितीने सुधारली.

"श्वास घेणे अशक्य होते, आज ट्रेडमिलवर चालतेय"
आपला अनुभव सांगताना शेख म्हणाल्या, "एकेकाळी साधा श्वास घेणेही कठीण झाले होते. व्हेंटिलेटर आणि संसर्गाचा तो काळ भीतीदायक होता, पण डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे मी आज बाह्य ऑक्सिजनशिवाय २०-३० मिनिटे ट्रेडमिलवर चालू शकतेय, हे माझ्यासाठी मोठे यश आहे."
जसलोक हॉस्पिटलचे सीईओ जितेंद्र हरयान यांनी या यशाचे श्रेय हॉस्पिटलमधील 'मल्टिडिसिप्लिनरी' टीमवर्क आणि अद्ययावत सुविधांना दिले आहे.
ही बातमी वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीचा एक नवा मापदंड ठरली असून, गंभीर स्थितीत असलेल्या रुग्णांसाठी आशेचा किरण ठरली आहे.

Comments

No comments yet.