युवकांनो, बना अधिकृत ड्रोन पायलट...  मोफत प्रशिक्षण आणि परवाना...  राहणे-खाणेही मोफत... असा घ्या लाभ...

Share:
Main Image
Last updated: 17-May-2026

अहिल्यानगर, (प्रतिनिधी) १७ मे - आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शेती, सर्वेक्षण, फोटोग्राफी आणि सुरक्षा यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये ड्रोनचा वापर झपाट्याने वाढत आहे. हीच भविष्यातील गरज ओळखून महाराष्ट्र शासनाच्या 'अमृत' (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी पूर्णपणे मोफत 'ड्रोन ऑपरेटर (पायलट) प्रशिक्षण' सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, हे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना नागरी विमानचालन महासंचालनालयाचा (DGCA) अधिकृत ड्रोन पायलट परवानाही मिळणार आहे.

राहण्याची आणि भोजनाची मोफत व्यवस्था
ग्रामीण व शहरी भागातील युवकांना स्वावलंबी बनवण्यासाठी 'अमृत ड्रोन मिशन' अंतर्गत हा उपक्रम राबविला जात आहे. हे प्रशिक्षण एकूण १० दिवसांचे असून, ते पूर्णपणे विनामूल्य आहे. प्रशिक्षणादरम्यान उमेदवारांच्या राहण्याची व भोजनाची व्यवस्था देखील संस्थेमार्फत मोफत केली जाणार आहे. महाराष्ट्रातील युवकांच्या सोयीसाठी पुणे, नाशिक, मुंबई आणि नागपूर येथे अद्ययावत प्रशिक्षण केंद्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

Advertisement

पात्रतेच्या अटी व नियम:
उत्पन्न मर्यादा: अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
वयोमर्यादा व शिक्षण: वय १८ ते ५५ वर्षांदरम्यान आणि उमेदवार किमान १२ वी उत्तीर्ण असावा.
जातींची पात्रता: इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ न मिळणाऱ्या खुल्या प्रवर्गातील २५ जातींमधील (उदा. ब्राह्मण, मारवाडी, राजपूत, गुजराती, सिंधी, जैन इत्यादी) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यासाठी पात्र आहेत.
विशेष प्राधान्य: शेतकरी कुटुंबातील उमेदवारांना प्रवेशासाठी विशेष प्राधान्य दिले जाईल. अर्जासोबत वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक आहे.

येथे साधा संपर्क:
इच्छुक व पात्र उमेदवारांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी 'अमृत' जिल्हा कार्यालय, फ्लॅट क्र. ०२, वरून अपार्टमेंट, आकाशवाणी केंद्रासमोर, सावेडी, अहिल्यानगर येथे प्रत्यक्ष भेट द्यावी किंवा ९११२२२८७६९ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

Comments

No comments yet.