येवला बस डेपोला मिळाल्या इतक्या अत्याधुनिक राजमाता जिजाऊ बसेस.... मंत्री छगन भुजबळ यांचा पाठपुरावा यशस्वी...

Share:
Main Image
Last updated: 16-May-2026

येवला, (प्रतिनिधी) १६ मे - येवला तालुक्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळकटी देणारा आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून साकार झाला असून येवला बस डेपोला दोन अत्याधुनिक “राजमाता जिजाऊ” बसेस प्राप्त झाल्या आहेत. यामुळे येवला तालुक्यातील प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार प्रवास सुविधा उपलब्ध होणार आहे.

येवला बस डेपोतील तब्बल १३ बसेसचे आयुर्मान पूर्ण झाल्याने त्या स्क्रॅपमध्ये जाणार होत्या. त्यामुळे ग्रामीण भागातील वाहतूक सेवा विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही बाब लक्षात घेऊन मंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत येवला डेपोला नवीन बसेस उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.

मंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्याला यश मिळत येवला बस डेपोला यापूर्वीच १० नवीन बसेस प्राप्त झाल्या आहेत. त्यानंतर आता आणखी दोन “राजमाता जिजाऊ” बसेस मिळाल्याने येवला डेपोच्या ताफ्यात मोठी भर पडली आहे. या बसेसमुळे ग्रामीण व शहरी भागातील प्रवाशांना अधिक चांगली सेवा मिळणार असून विद्यार्थ्यांपासून महिला, शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Advertisement

विशेष म्हणजे “राजमाता जिजाऊ” बसेस या आधुनिक सुविधांनी सुसज्ज असून सुरक्षितता, आरामदायी आसन व्यवस्था आणि सुकर प्रवास यासाठी या बसेस ओळखल्या जातात. येवला तालुक्यातील वाढती प्रवासी संख्या आणि ग्रामीण भागातील वाहतुकीची गरज लक्षात घेता या बसेस अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत.

प्रतिक्रिया...

“मंत्री छगन भुजबळ यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे येवला तालुक्याच्या विकासाला गती मिळत आहे. येवला बस डेपोला नवीन राजमाता जिजाऊ बसेस मिळाल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांची मोठी सोय होणार असून ग्रामीण भागातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होईल. भविष्यातही येवला तालुक्याच्या विकासासाठी अशाच प्रकारे प्रयत्न सुरू राहतील.”

माजी खासदार समीर भुजबळ

Comments

No comments yet.