गोविंदनगरच्या ठकबाज दांपत्याचा कारनामा... साडेचार लाखांना गंडवले...

Share:
Main Image
Last updated: 16-May-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १६ मे - शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून शहरातील एका कुटुंबाला साडेचार लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. गोविंदनगर भागातील एका ठकबाज दांपत्याने हा फसवणुकीचा डाव रचला असून, या जोडप्याने शहरात अशाच प्रकारे अनेकांना गंडविल्याची चर्चा आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात फसवणूक आणि आयटी अ‍ॅक्टनुसार (माहिती तंत्रज्ञान कायदा) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हितेश अरुण लाखे व लक्ष्मी हितेश लाखे (दोघे रा. वझरे चौक, गोविंदनगर, नाशिक) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित ठकबाज दांपत्याचे नाव आहे. याप्रकरणी सोनालीका हर्षल माळी (रा. आनंदवली, गंगापूर रोड, नाशिक) यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

१० टक्के परताव्याच्या आमिषाला बळी
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी संशयित लाखे दांपत्याने फिर्यादी सोनालीका माळी आणि त्यांच्या पतीचा विश्वास संपादन केला. "आम्ही शेअर मार्केटमध्ये चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करतो, तुम्ही आमच्या माध्यमातून पैसे गुंतवल्यास तुम्हाला दरमहा तब्बल १० टक्के परतावा (रिटर्न्स) मिळवून देऊ," असे मोठे आमिष या संशयित जोडप्याने माळी दांपत्याला दाखवले होते. संशयितांच्या या बोलण्यावर विश्वास ठेवून माळी दांपत्याने गुंतवणुकीची तयारी दर्शवली.

Advertisement

वर्ष उलटले तरी मिळेना रक्कम!
संशयितांच्या आमिषाला बळी पडून माळी दांपत्याने वेळोवेळी एकूण ४ लाख ४७ हजार ५०० रुपयांची रक्कम संशयित हितेश लाखे व लक्ष्मी लाखे यांच्या स्वाधीन केली. मात्र, पैसे घेऊन वर्ष उलटले तरी माळी दांपत्याला ना ठरलेला परतावा मिळाला, ना त्यांची मूळ गुंतवणुकीची रक्कम परत मिळाली. माळी यांनी संशयितांकडे पैशांची विचारणा केली असता, त्यांनी टाळाटाळ करण्यास सुरुवात केली.

अनेकांची फसवणूक झाल्याची शक्यता
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अखेर माळी दांपत्याने गंगापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोन्ही संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, या ठकबाज दांपत्याने शहरातील इतरही अनेक नागरिकांना अशाच प्रकारे गुंतवणुकीचे आमिष दाखवून लाखो रुपयांना गंडविल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक (PSI) पाटील करत आहेत.

Comments

No comments yet.