नाशिक, (प्रतिनिधी) १६ मे - 'रिलेशनशिप'मध्ये राहण्याची मागणी फेटाळल्याचा राग मनात धरून एका २१ वर्षीय तरुणाने सोशल मीडियावर युवतीची प्रचंड बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आधुनिक 'ए.आय.' (Artificial Intelligence) तंत्रज्ञानाचा गैरवापर करून युवतीचे अश्लील फोटो तयार करत ते इन्स्टाग्रामवर व्हायरल केल्याने हे प्रकरण पोलिसात पोहोचले आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात विनयभंगासह आयटी अॅक्टनुसार (माहिती तंत्रज्ञान कायदा) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रसाद खंडू देवरे (वय २१, रा. पारनेर, ता. सटाणा, जि. नाशिक) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित युवतीने गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पीडितेच्या नावाने उघडले बनावट खाते
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित युवती आणि संशयित प्रसाद देवरे हे एकमेकांच्या परिचयाचे आहेत. संशयित प्रसाद हा गेल्या काही दिवसांपासून तरुणीकडे रिलेशनशिपमध्ये राहण्यासाठी तगादा लावत होता आणि त्यासाठी तिची कोंडी करून वेळोवेळी धमक्याही देत होता. मात्र, तरुणीने त्याच्या या धमक्यांना आणि मागणीला अजिबात दाद दिली नाही.
याचाच सूड उगवण्यासाठी संशयिताने २ ते ८ मे दरम्यान एक कुटील कारस्थान रचले. त्याने पीडित तरुणीची जन्मतारीख, मोबाईल नंबर आणि जुने फोटो वापरून 'इन्स्टाग्राम' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तिच्याच नावाने एक परस्पर बनावट खाते (फेक आयडी) तयार केले.
'एआय' तंत्रज्ञानाचा घातक गैरवापर
संशयिताने केवळ बनावट खाते उघडले नाही, तर थेट आधुनिक 'एआय' तंत्रज्ञानाचा वापर केला. या तंत्रज्ञानाच्या मदतीने त्याने पीडित तरुणीचे अश्लील फोटो मॉर्फ करून तयार केले आणि ते स्वतःसोबत जोडले. हे आक्षेपार्ह आणि अश्लील फोटो त्याने इन्स्टाग्रामवरील त्या बनावट आयडीवरून सोशल मीडियावर व्हायरल केले.
बदनामीनंतर तरुणीची पोलिसात धाव
हा सर्व प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे आणि आपली नाहक बदनामी होत असल्याचे लक्षात येताच पीडित तरुणीने तात्काळ गंगापूर पोलीस ठाणे गाठून आपबिती कथन केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून संशयित प्रसाद देवरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मोरे करत आहेत.