"ठाकरे कुटुंबाच्या कृपेने आयुष्याचे सोने झाले!"  लेकीच्या यशानंतर बाळा नांदगावकर अत्यंत भावूक...

Share:
Main Image
Last updated: 16-May-2026

मुंबई, (प्रतिनिधी) १६ मे - "जीवनात आपल्याला जे जे करता आले नाही, जे जे मिळाले नाही ते आपल्या मुलांना मिळावे यासाठी प्रत्येक आई-वडील आयुष्यभर झटत असतात. आज माझी कन्या सृष्टी हिने आमच्या कष्टांचे चीज केले," अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांची कन्या सृष्टी बाळा नांदगावकर हिने अमेरिकेतील प्रतिष्ठित 'युनिव्हर्सिटी ऑफ साउदर्न कॅलिफोर्निया' (University of Southern California) येथून कायद्यातील पदव्युत्तर पदवी (LLM - लॉ मास्टर्स) यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. या यशानंतर नांदगावकर यांनी सोशल मीडियावर एक अत्यंत भावूक पोस्ट शेअर करत ठाकरे कुटुंबाप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

सैनिकाऐवजी झालो 'शिवसैनिक', तिथेच जीवनाचे सोने झाले!
आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत बाळा नांदगावकर म्हणाले की, "तरुणपणी सैन्यात भरती होऊन देशसेवा करण्याची माझी इच्छा होती, मात्र वयोमर्यादा संपल्याने मी सैनिक बनू शकलो नाही. पण, मी 'शिवसैनिक' झालो आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या परिसस्पर्शाने माझ्या जीवनाला नवीन वळण मिळाले. आर्थिक परिस्थितीमुळे मला स्वतःला वकिलीचे (Law) शिक्षण घेण्याची इच्छा असूनही घेता आले नाही, मात्र आज माझ्या मुलीने हा टप्पा पार केला आहे."

Advertisement

राजसाहेबांचे प्रोत्साहन अन् उद्धवसाहेबांचे मार्गदर्शन
नांदगावकर यांनी आपल्या कुटुंबाच्या यशात ठाकरे कुटुंबाचे असणारे स्थान अधोरेखित केले आहे. "माझ्या कुटुंबात काहीही चांगले होत असेल तर त्यात माननीय राजसाहेब ठाकरे आणि शर्मिला वहिनी यांचा मोठा सहभाग असतो. त्यांनी वेळोवेळी सृष्टीला उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. तसेच, या कोर्सदरम्यान अभ्यासाचा एक भाग म्हणून कोविड परिस्थितीबद्दल माहिती हवी असताना, माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी स्वतः सृष्टीला फोन करून सविस्तर मार्गदर्शन केले होते," असे नांदगावकरांनी आवर्जून नमूद केले.

जगप्रसिद्ध 'जिनिव्हा अकॅडमी'त निवड!
सृष्टी नांदगावकरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. अमेरिकेतील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आता तिची स्वित्झर्लंडमधील जगप्रसिद्ध 'जिनिव्हा अकॅडमी' (Geneva Academy) च्या पुढील अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. तसे अधिकृत पत्रही नांदगावकर कुटुंबाला प्राप्त झाले असून, हा कुटुंबासाठी दुहेरी आनंदाचा क्षण आहे.
"आयुष्यात मागे वळून बघताना एक निश्चितपणे जाणवते की, ठाकरे कुटुंबाच्या कृपेने माझ्या आयुष्याचे सोने झाले. मी कायमच या कुटुंबाच्या ऋणात राहीन. 'मांगे मिले ना भीक, बिन मांगे मिले मोती' ही म्हण माझ्या मनात कोरली गेली आहे, आपण फक्त अपेक्षेविना चांगले कर्म करत राहावे," असा मोलाचा संदेशही त्यांनी शेवटी दिला आहे. सृष्टीच्या या जागतिक यशाबद्दल राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून नांदगावकर कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

https://www.facebook.com/share/18nik9FzZU/

Comments

No comments yet.