सोसायटीतील पार्किंगचा वाद मिटवणे महागात... मध्यस्थी करणाऱ्या शेजाऱ्यावर चाकूने हल्ला...

Share:
Main Image
Last updated: 16-May-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १६ मे - सोसायटीतील दोन सदस्यांमधील पार्किंगचा वाद मिटविणे एका व्यक्तीला भलतेच महागात पडले आहे. "महिलेशी वाद घालू नका," असा समजुतीचा सल्ला देणाऱ्या शेजाऱ्यावर एका माथेफिरूने चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना हिरावाडीतील तांबोळीनगर भागात घडली. या हल्ल्यात मध्यस्थी करणारे शेजारी गंभीर जखमी झाले असून, याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परेश पाटील (रा. तांबोळीनगर, हिरावाडी, पंचवटी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. या घटनेप्रकरणी पीडित महिलेने पोलिसांत फिर्याद दिली असून, गणेश ठाकूर असे चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या शेजाऱ्याचे नाव आहे. संशयित आरोपी, तक्रारदार महिला आणि जखमी ठाकूर हे सर्व एकाच सोसायटीत राहतात.

नेमकी घटना काय घडली?

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित नोकरदार महिला गुरुवारी (दि. १४) आपली कार्यालयीन सेवा बजावून घरी परतली होती. तिने नेहमीप्रमाणे सोसायटीच्या आवारात आपली दुचाकी पार्क केली आणि ती घरात निघून गेली. त्यानंतर रात्रीच्या वेळी दुचाकीच्या डिक्कीत राहिलेला जेवणाचा डबा आणण्यासाठी ती पुन्हा पार्किंगमध्ये खाली आली.

Advertisement

त्यावेळी संशयित परेश पाटील याने या महिलेची दुचाकी तिथून हटवून दुसऱ्या ठिकाणी लावली होती आणि स्वतःचे वाहन त्या जागेवर पार्क केले होते. या प्रकाराबाबत महिलेने पाटील याला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. याचा राग आल्याने संशयिताने आरडाओरड करत महिलेला अद्वातद्वा बोलून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

...आणि मध्यस्थी ठरली महागात!

रात्रीच्या वेळी पार्किंगमध्ये अचानक मोठा गोंधळ आणि आरडाओरड सुरू झाल्याने सोसायटीतील इतर सदस्यांनी तातडीने पार्किंगच्या दिशेने धाव घेतली. यावेळी शेजारी राहणाऱ्या गणेश ठाकूर यांनी पुढे होत संशयित परेश पाटील याला शांत राहण्याचा आणि महिलेशी वाद न घालण्याचा सल्ला दिला. याचा प्रचंड राग आल्याने संशयिताने, "तुला बघून घेतो," अशी धमकी देत खिशातून धारदार चाकू काढून ठाकूर यांच्यावर थेट वार केला.

दोन्ही हातांवर गंभीर जखमा

संशयिताने केलेल्या या अचानक वारामुळे ठाकूर यांनी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या हल्ल्यात त्यांच्या दोन्ही हातांना गंभीर दुखापत झाली असून ते रक्तबंबाळ झाले. या घटनेमुळे सोसायटीत काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या पोलीस हवालदार पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Comments

No comments yet.