NEET पेपर लीक प्रकरण... पुण्याच्या प्राध्यापिकेला बेड्या... रिटायरमेंटला ६ महिने उरले असतानाच...

Share:
Main Image
Last updated: 16-May-2026

पुणे, (प्रतिनिधी) १६ मे - वैद्यकीय प्रवेशासाठी झालेल्या 'NEET-UG 2026' परीक्षा पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणेने (CBI) मोठी कारवाई केली आहे. मनीषा वाघमारेच्या अटकेनंतर आता या प्रकरणाची मुख्य सूत्रधार आणि पुण्यातील नामांकित मॉडर्न कॉलेजमधील वरिष्ठ बॉटनी (वनस्पतीशास्त्र) प्राध्यापिका मनीषा गुरुनाथ मांढरे यांना सीबीआयने थेट दिल्लीतून बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे, मांढरे यांची राष्ट्रीय परीक्षा एजन्सीकडून (NTA) नीट परीक्षेसाठी 'एक्स्पर्ट' (तज्ज्ञ) म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान, या प्रकरणाचा तपास करत असतानाच आता याचे 'बीड' कनेक्शनही समोर आले असून, लातूरमधून अटक करण्यात आलेले निवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी हे मूळचे बीडचे असल्याचे उघड झाले आहे.

कोण आहेत मनीषा मांढरे?

मनीषा मांढरे या पुण्याच्या कात्रज परिसरातील राजस सोसायटीत वास्तव्यास असून, त्या गेल्या १८ वर्षांपासून पुण्यातील नामांकित मॉडर्न कॉलेजमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. अवघ्या सहा महिन्यांत त्या सेवेतून निवृत्त होणार होत्या. 'NTA' च्या माध्यमातून त्यांना बायोलॉजी (बॉटनी आणि झूलॉजी) या विषयांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये पूर्ण 'अ‍ॅक्सेस' मिळाला होता. याच पदाचा गैरवापर करून त्यांनी पेपर लीक केल्याचा संशय आहे.

स्वतःच्या घरी घेतले 'विशेष' क्लासेस!

तपासात समोर आलेल्या धक्कादायक माहितीनुसार, मनीषा मांढरे यांनी एप्रिल २०२६ मध्ये पुण्यात अटक करण्यात आलेल्या वाघमारेच्या माध्यमातून काही विद्यार्थ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांनी आपल्या कात्रज येथील राहत्या घरी विद्यार्थ्यांचे विशेष कोचिंग क्लासेस घेतले. या क्लास दरम्यान त्यांनी बॉटनी आणि झूलॉजी या विषयातील संभाव्य (लीक झालेले) प्रश्न विद्यार्थ्यांना लिहून दिले, तसेच पुस्तकांमध्ये ते प्रश्न 'मार्क' करून घेतल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर आहे.

विद्यार्थ्यांचा दावा; 'तेच' प्रश्न परीक्षेत आले!

Advertisement

३ मे २०२६ रोजी झालेल्या नीटच्या मुख्य परीक्षेत प्राध्यापिका मनीषा मांढरे यांनी क्लासमध्ये लिहून दिलेले अनेक प्रश्न जसेच्या तसे आल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. यामुळे परीक्षा घेणाऱ्या 'NTA' च्या गोपनीयतेवर आणि सुरक्षिततेवर आता मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

देशभरात ६ ठिकाणी छापेमारी; लॅपटॉप, बँक स्टेटमेंट्स जप्त

मनीषा मांढरे यांच्या अटकेनंतर सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशभरात ६ वेगवेगळ्या ठिकाणी मोठी छापेमारी करण्यात आली आहे. या छाप्यात संशयितांचे लॅपटॉप, मोबाईल, बँक खात्यांचे स्टेटमेंट्स आणि अनेक महत्त्वपूर्ण कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या आर्थिक व्यवहारांतून मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

पेपरफुटीचे 'बीड' कनेक्शन; प्राध्यापकाचे घर पाडले

दुसरीकडे, लातूरमधून सीबीआयने अटक केलेले निवृत्त रसायनशास्त्र (Chemistry) प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी हे मूळचे बीडचे रहिवासी आहेत. नीटच्या पेपर सेटिंग कमिटीत त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. सीबीआयचा संशय बळावताच बीडच्या शाहूनगर परिसरातील त्यांचे वडिलोपार्जित घर नुकतेच पाडण्यात आले असून, सध्या तिथे नूतनीकरणाचे काम सुरू आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या या रॅकेटची पाळेमुळे मराठवाड्यात खोलवर रुजल्याने बीड आणि लातूर जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.

या प्रकरणात आतापर्यंत झालेल्या अटकेमुळे शिक्षण क्षेत्र हादरले असून, सीबीआयचे सहाय्यक आयुक्त आणि वरिष्ठ अधिकारी या रॅकेटमधील इतर 'मोठ्या माशांचा' शोध घेत आहेत.

Comments

No comments yet.