नाशिक, (प्रतिनिधी) १६ मे - मूळ तक्रारदार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांविरुद्ध आलेल्या एका अर्जावर कोणतीही कायदेशीर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात ५ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदाराला नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात अटक केली आहे. संतोष राघो ब्राम्हणे (वय ४४, बक्कल नंबर १३६१) असे लाचखोर पोलीस हवालदाराचे नाव आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या संतोष ब्राम्हणे याच्याकडे मूळ तक्रारदार आणि त्यांच्या कुटुंबीयांविरुद्धच्या एका अर्जाची चौकशी सुरू होती. या अर्जावरून तक्रारदारांवर कोणतीही कारवाई न करण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी हवालदार ब्राम्हणे याने १४ मे २०२६ रोजी ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याप्रकरणी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार नोंदवली.
पिंपळगाव पोलीस ठाण्यातच रचला सापळा
तक्रारीची शहानिशा केल्यानंतर १५ मे २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक संतोष रवींद्र पैलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव (बसवंत) पोलीस स्टेशन परिसरात सापळा रचण्यात आला. हवालदार संतोष ब्राम्हणे याने तक्रारदाराकडून ५ हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताच, दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले.
गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
याप्रकरणी लाचखोर पोलीस हवालदार संतोष ब्राम्हणे याच्याविरुद्ध पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७, ७ अ आणि भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २३८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
एसीबीचे अधिकारी आणि पथक:
ही धडक कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक श्री. भारत तांबडे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. माधव रेड्डी, श्री. सुनील दोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस उपअधीक्षक संतोष पैलकर, तपास अधिकारी पोलीस निरीक्षक श्रीमती रूपाली खांडवी आणि अंमलबजावणी पथकातील पोलीस हवादार गणेश निंबाळकर, प्रमोद चव्हाणके आणि विनोद पवार यांनी केली आहे.