मुंबई, (प्रतिनिधी) १६ मे - महाराष्ट्र पोलीस दलात शुक्रवारी मोठा फेरबदल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य प्रशासनाप्रमाणेच पोलीस दलातही मोठे फेरबदल करण्याचे संकेत दिले होते, त्यानुसार गृह विभागाने ४४ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई आणि सोलापूर यांसारख्या महत्त्वाच्या शहरांमधील पोलीस उपआयुक्तांसह (DCP) अपर पोलीस अधीक्षकांचा समावेश आहे.
नाशिक आणि पुण्यात महत्त्वाचे बदल
नाशिक शहराच्या गुन्हे अन्वेषण विभागात संदीप जाधव यांची पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर चंद्रकांत गवळी यांची नाशिक शहर पोलीस उपआयुक्तपदी बदली झाली आहे. याव्यतिरिक्त, अकबर पठाण आणि महेश चिमटे यांची नाशिकमधील महाराष्ट्र पोलीस अकादमीत नियुक्ती करण्यात आली आहे. पुण्यातही विशाल गायकवाड, सांभाजी कदम आणि पल्लवी बर्गे यांसारख्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.
मुंबई आणि पिंपरी-चिंचवडमध्ये फेरबदल
मुंबईतील पोलीस उपआयुक्त पदावर गणेश शिंदे, पंकज डहाणे, कविता नेरकर, पूर्णिमा चौगुले आणि शिवाजी पवार यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांची वर्णी लागली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये संजय गौंडा पाटील, धीरज पाटील आणि रोहिदास पवार यांची उपआयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बदल्यांची यादी (थोडक्यात):
नवी मुंबई: विजय खरात, विशाल ठाकूर, योगेश चव्हाण, राहुल खाडे.
दहशतवादी विरोधी पथक (ATS): दिनेश बारी (पोलीस अधीक्षक).
फोर्स वन: मितेश घट्टे (पोलीस अधीक्षक).
अमरावती: अनिता पाटील, दीपक गिऱ्हे.
सोलापूर: विजय कबाडे (अपर पोलीस अधीक्षक), प्रितम यावलकर (उपआयुक्त).
जालना: विक्रम साळी (अपर पोलीस अधीक्षक).
छत्रपती संभाजीनगर: प्रशांत स्वामी (अपर पोलीस अधीक्षक ग्रामीण).
या तडकाफडकी बदल्यांमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून, कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. या ४४ अधिकाऱ्यांना तातडीने आपापल्या नवीन नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.