नाशिकमध्ये नराधमांचा उच्छाद... तीन वेगवेगळ्या घटनांत अल्पवयीन मुलींवर अत्याचार...

Share:
Main Image
Last updated: 15-May-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १५ मे - नाशिक शहरात अल्पवयीन मुली सुरक्षित नसल्याचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. शहरात एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या घटना उघडकीस आल्या असून यामध्ये बलात्कार आणि विनयभंगासारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. याप्रकरणी मुंबईनाका, अंबड आणि इंदिरानगर पोलीस ठाण्यात 'पोस्को' (POCSO) कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मोलकरणीच्या नातीवर वेळोवेळी अत्याचार

अशोका मार्ग परिसरात एका नराधमाने माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य केले आहे. सूर्यकांत वाघ उर्फ अण्णा असे संशयिताचे नाव असून, त्याने आपल्या घरी काम करणाऱ्या वृद्ध मोलकरणीच्या अल्पवयीन नातीवर २०२२ पासून वेळोवेळी बलात्कार केला. "आईला कामावरून काढून टाकेन आणि जीवे ठार मारीन," अशी धमकी देऊन तो हे कृत्य करत होता. अखेर आजी आणि नातीने हिंमत दाखवत मुंबईनाका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. उपनिरीक्षक शेख या प्रकरणाचा तपास करत आहेत.

चुलत बहिणीवरच ओढवली वेळ

Advertisement

दुसरी संतापजनक घटना सिडकोतील सह्याद्रीनगर भागात घडली. हिंगोलीहून कामाच्या शोधात नाशिकला आलेला निखील थिटे (२१) हा तरुण आपल्या काकांकडे राहत होता. काका-काकू घरात नसल्याची संधी साधून त्याने स्वतःच्या अल्पवयीन चुलत बहिणीवर बलात्कार केला. घरच्यांना ठार मारण्याची धमकी देऊन त्याने हे कृत्य केले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक निरीक्षक पलांडे तपास करत आहेत.

लग्नमंडपात विनयभंग

तिसरी घटना इंदिरानगर हद्दीतील आनंदनगर भागात घडली. धोंगडे नगर येथील एका विवाह सोहळ्यात सुनील कुमार लालदा प्रसाद यादव (३६) याने आपल्या नातेवाईक अल्पवयीन मुलीला लग्नमंडपाच्या मागे ओढत नेऊन तिचा विनयभंग केला. पीडित मुलीच्या तक्रारीवरून इंदिरानगर पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सहाय्यक निरीक्षक सोनार पुढील तपास करत आहेत.

शहरात घडलेल्या या लागोपाठच्या घटनांमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून, गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Comments

No comments yet.