आयपीएलमध्ये नाशिकच्या कन्येचा डंका... समीक्षा मुंदडाने डिझाइन केली राजस्थान रॉयल्सची गुलाबी जर्सी...

Share:
Main Image
Last updated: 15-May-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १५ मे - इंडियन प्रीमिअर लीगच्या (IPL) मैदानावर नाशिकच्या खेळाडूंनी आणि समालोचकांनी यापूर्वीच आपली छाप पाडली असताना, आता एका १९ वर्षीय नाशिककर तरुणीने आपल्या सर्जनशीलतेने (Creativity) क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात ९ मे रोजी झालेल्या सामन्यात राजस्थानच्या संघाने परिधान केलेली विशेष 'गुलाबी जर्सी' नाशिकच्या समीक्षा रामेश्वर मुंदडा हिने डिझाइन केली आहे.

८५०० स्पर्धकांमधून समीक्षाची निवड

राजस्थान रॉयल्सच्या 'HunaRR Manch contest' या अखिल भारतीय स्तरावरील स्पर्धेत समीक्षाने सहभाग घेतला होता. देशभरातून आलेल्या ८ हजार ५०० हून अधिक प्रवेशिकांमधून समीक्षाच्या डिझाइनची निवड करण्यात आली. राजस्थान रॉयल्सचा संपूर्ण संघ मैदानात ही जर्सी घालून उतरला, तेव्हा नाशिककरांसाठी तो एक अभिमानाचा क्षण ठरला.

काय आहे 'पिंक प्रॉमिस' जर्सीचे वैशिष्ट्य?

Advertisement

रॉयल्सचा हा सामना 'पिंक प्रॉमिस मॅच' म्हणून ओळखला जातो. राजस्थान रॉयल्स फाउंडेशनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला सक्षमीकरणाला पाठिंबा देण्यासाठी हा उपक्रम राबवला जातो. या जर्सीच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी देखील जपली गेली आहे. या सामन्यात मारल्या गेलेल्या प्रत्येक षटकारामागे राजस्थानमधील सांबर शहरातील सहा घरांमध्ये सौरऊर्जेद्वारे वीज पोहोचवली जाणार आहे.

जडेजाला जर्सी देण्याचे मिळाले भाग्य

कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी असलेल्या समीक्षाला लहानपणापासूनच डिझाइनिंगची आवड आहे. क्रिकेटची चाहती असलेल्या समीक्षाला तिने डिझाइन केलेली जर्सी स्वतःच्या हाताने दिग्गज क्रिकेटपटू रविंद्र जडेजा याला भेट देण्याची संधी मिळाली. यशस्वी जैस्वाल, रियान पराग आणि वैभव सूर्यवंशी यांसारख्या खेळाडूंच्या संघाशी अशा प्रकारे जोडले जाणे हे आपले स्वप्न सत्यात उतरल्यासारखे असल्याचे समीक्षाने सांगितले.

नाशिकचा आयपीएलमधील वाढता दबदबा

नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी समीर रकटे यांनी समीक्षाच्या यशाचे कौतुक केले आहे. आयपीएलमध्ये यापूर्वी नाशिकच्या रामकृष्ण घोषने चेन्नई संघाकडून, तर साहिल पारखने दिल्ली संघाकडून प्रतिनिधीत्व केले आहे. सोहंम शहाणे 'जिओ हॉटस्टार'वर समालोचन करत आहे. आता समीक्षाच्या निमित्ताने डिझाइन क्षेत्रातही नाशिकचे नाव आयपीएलच्या इतिहासात कोरले गेले आहे.

Comments

No comments yet.