कोयत्याचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीला घरात ओढले... बलात्कार, पीडिता गर्भवती...

Share:
Main Image
Last updated: 14-May-2026

नाशिक, (विशेष प्रतिनिधी) १४ मे - शहरातील गंगापूर, सातपूर, इंदिरानगर आणि सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणणाऱ्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून तपास सुरू केला आहे.

१. लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार; अल्पवयीन मुलगी गर्भवती (गंगापूर)

गंगापूर रोडवरील दत्त चौक भागात राहणाऱ्या लहू संपत खंदारे (२०) या संशयिताने एका अल्पवयीन मुलीस प्रेमाच्या जाळ्यात ओढले. गेल्या ऑक्टोबरमध्ये त्याने तिला एका कॅफेमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर घरी कोणी नसल्याची संधी साधून वारंवार अत्याचार केल्याने मुलगी गर्भवती राहिली. संशयिताने तिला जीवे मारण्याची धमकीही दिली होती. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

२. दागिने लाटले आणि लग्नास नकार (इंदिरानगर)

Advertisement

धुळे जिल्ह्यातील साक्री येथील दानिश शकिल मन्सुरी या संशयिताने २०२१ पासून इंदिरानगर भागातील एका असाह्य महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार केला. या काळात त्याने महिलेचा विश्वास संपादन करून तिच्या दागिन्यांचा अपहार केला आणि नंतर लग्नास नकार दिला. पीडितेच्या तक्रारीवरून इंदिरानगर पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

३. कोयत्याचा धाक दाखवून घरात ओढले (सातपूर)

सातपूरमधील कामगारनगर भागात सौरभ दिपक निंबाळकर (२०) याने एका अल्पवयीन मुलीला कोयत्याचा धाक दाखवून बळजबरीने स्वतःच्या घरात ओढून नेले. तेथे त्याने बलात्काराचा प्रयत्न केला, मात्र मुलीने आरडाओरड केल्याने नागरिक जमा झाले आणि पोलिसांनी संशयिताला अटक केली. सातपूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गंभीर गुन्हा दाखल आहे.

४. भररस्त्यात महिलेचा विनयभंग (सरकारवाडा)

कॉलेज रोडवरील बिग बाजार समोर न्यायालयीन कामकाज आटोपून जाणाऱ्या एका महिलेचा संदिप यशवंत वाकळे (४३) याने पाठलाग करून विनयभंग केला. संशयिताने महिलेला शिवीगाळ व दमदाटी करत मारहाणही केली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments

No comments yet.