रशियाला दिला निरोप... नाशिक हवाई दलाकडून नौदलाच्या मिग-२९ विमानाच्या इजेक्शन सीटचे स्वदेशी ओव्हरहॉल....

Share:
Main Image
Last updated: 14-May-2026

नाशिक, (विशेष प्रतिनिधी) १४ मे - भारतीय संरक्षण दलांच्या 'आत्मनिर्भरता' आणि 'त्रि-सेवा समन्वया'ला (Jointness) बळ देणारी एक अत्यंत महत्त्वाची घटना नाशिकमध्ये घडली आहे. भारतीय वायुसेनेच्या नाशिक येथील बेस रिपेअर डेपोने (११ बीआरडी) भारतीय नौदलाच्या मिग-२९ के (MiG-29K) लढाऊ विमानाच्या पहिल्या इजेक्शन सीटचे स्वदेशी तंत्रज्ञानाद्वारे यशस्वी ओव्हरहॉल पूर्ण केले आहे. या यशासह आता या तांत्रिक कामासाठी रशियावर अवलंबून राहण्याची गरज उरलेली नाही.

ओव्हरहॉल करण्यात आलेली ही पहिली इजेक्शन सीट आज, १३ मे २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित एका विशेष समारंभात भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली.

रशियावरील अवलंबित्व संपले

यापूर्वी भारतीय नौदलाच्या मिग-२९ के विमानांच्या इजेक्शन सीट्स ओव्हरहॉलसाठी रशियाला पाठवाव्या लागत होत्या. मात्र, नाशिक बीआरडीने सुखोई-३० एमकेआय विमानांच्या देखभालीचा आपला प्रदीर्घ अनुभव वापरून हे क्लिष्ट तंत्रज्ञान स्वदेशी स्तरावर विकसित केले आहे. या तंत्रज्ञानाला वायुयोग्यता प्रमाणन संस्था 'आरसीएमए'ची (RCMA) अधिकृत मान्यताही प्राप्त झाली आहे.

Advertisement

दिग्गज अधिकाऱ्यांची उपस्थिती

नाशिक येथे झालेल्या या हस्तांतरण सोहळ्याला भारतीय वायुसेनेच्या मेंटेनन्स कमांडचे एअर मार्शल यल्ला उमेश आणि भारतीय नौदलाच्या वेस्टर्न नेव्हल कमांडचे व्हाइस ॲडमिरल राहुल विलास गोखले उपस्थित होते. वायुसेनेने नौदलाच्या विमानाच्या देखभालीची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणे, हा दोन्ही दलांमधील उत्कृष्ट समन्वयाचा नमुना मानला जात आहे.

नाशिक बीआरडी: तांत्रिक कौशल्याचे केंद्र

नाशिक येथील हा डेपो मिग-२९ आणि सुखोई-३० एमकेआय सारख्या अत्याधुनिक लढाऊ विमानांच्या 'मेजर ओव्हरहॉल'साठी प्रसिद्ध आहे. या डेपोने काळानुरूप अत्यंत जटिल दुरुस्ती क्षमता आणि विशेषीकृत पायाभूत सुविधा विकसित केल्या आहेत. ही यशस्विता परदेशी सहाय्यावर अवलंबित्व कमी करण्याच्या भारताच्या बांधिलकीचे प्रतीक असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Comments

No comments yet.