भोंदू अशोक खरात प्रकरणात 'बडा मासा' गळाला... जगदंबा पतसंस्थेचे संस्थापक नामकर्ण आवारे अटकेत...

Share:
Main Image
Last updated: 14-May-2026

सिन्नर, (प्रतिनिधी) १४ मे - सिन्नरमधील बहुचर्चित भोंदू अशोक खरात प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत सिन्नर तालुका औद्योगिक वसाहतीचे (STICE) चेअरमन आणि जगदंबा माता पतसंस्थेचे संस्थापक नामकर्ण आवारे यांना अटक केली आहे. खरातने पतसंस्थेत उघडलेल्या ३२ बनावट खात्यांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ही अटक करण्यात आली असून, यामुळे सिन्नरच्या राजकीय आणि औद्योगिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

बनावट खाती आणि आर्थिक गैरव्यवहार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक खरातने जगदंबा माता पतसंस्थेत ३२ विविध खाती उघडली होती. या खात्यांद्वारे मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार करण्यात आले. या सर्व प्रक्रियेला आणि बनावट खात्यांना तत्कालीन सचिव तथा संचालक नामकर्ण आवारे यांची संमती असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. खरातने दिलेल्या कबुलीनंतर सिन्नर पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत आवारे यांना बेड्या ठोकल्या.

'असा मी नामकर्ण' पुस्तकातील स्तुती पडली महागात?

Advertisement

नामकर्ण आवारे हे केवळ पतसंस्थेचे संस्थापक नसून सिन्नरमधील एक वजनदार व्यक्तिमत्त्व मानले जातात. विशेष म्हणजे, त्यांनी लिहिलेल्या ‘असा मी नामकर्ण’ या आपल्या आत्मचरित्रात अशोक खरातची स्तुती करणारे एक स्वतंत्र प्रकरण लिहिले होते. तेव्हापासूनच आवारे आणि खरात यांचे संबंध चर्चेत आले होते. आता थेट आर्थिक गुन्ह्यात सहभाग समोर आल्याने आवारे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

खरातला १८ मे पर्यंत पोलीस कोठडी

दुसरीकडे, मुख्य आरोपी अशोक खरातला आज सिन्नर येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. जगदंबा पतसंस्थेतील बनावट खाती आणि फसवणुकीच्या गुन्ह्यात न्यायालयाने खरातला १८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आवारे यांना उद्या (गुरुवारी) न्यायालयात हजर केले जाणार आहे.

या कारवाईमुळे या प्रकरणात आणखी काही जणांचे धाबे दणाणले असून, सिन्नर पोलीस या आर्थिक घोटाळ्याच्या मुळापर्यंत जाण्याची शक्यता आहे.

Comments

No comments yet.