रुपाली चाकणकरांना 'गुवाहाटी दौरा' भोवला... भोंदू खरातसोबतच्या हॉटेल मुक्कामाचे पुरावे समोर...

Share:
Main Image
Last updated: 14-May-2026

मुंबई, (विशेष प्रतिनिधी) १४ मे - नाशिकच्या मिरगावातील भोंदू बाबा अशोक खरात याच्या काळ्या कृत्यांनी महाराष्ट्र हादरलेला असतानाच, आता या प्रकरणाचे धागेदोरे राजकीय वर्तुळात पोहोचले आहेत. महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) उद्या, गुरुवारी चौकशीसाठी पाचारण केले आहे. खरातसोबतचा त्यांचा २०२१ मधील गुवाहाटी दौरा आणि हॉटेलमधील मुक्काम समोर आल्याने चाकणकर चहूबाजूंनी अडकल्याचे मानले जात आहे.

गुवाहाटीतील 'ब्लू रॅडिसन' मुक्काम चर्चेत

अशोक खरातशी केवळ आध्यात्मिक संबंध असल्याचे सांगणाऱ्या रुपाली चाकणकर यांचा खरातसोबतचा गुवाहाटी दौरा उघड झाला आहे.

दौऱ्याचा कालावधी: २८ ऑगस्ट २०२१ ते ३० ऑगस्ट २०२१ या काळात रुपाली चाकणकर, त्यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर आणि अशोक खरात हे तिघेही गुवाहाटीतील प्रसिद्ध 'ब्लू रॅडिसन' हॉटेलमध्ये वास्तव्यास होते.

पूजा-अर्चा आणि आर्थिक व्यवहार: गुवाहाटीतील कामाख्या देवी आणि नऊ ग्रहांच्या पूजेसाठी हे तिघेही तेथे गेल्याची शक्यता आहे. खरातने भक्तांना ग्रहांच्या खड्यांच्या नावाखाली लाखो रुपयांना गंडा घातल्याचा आरोप असून, या दौऱ्यात झालेल्या आर्थिक व्यवहारांवर आता तपास यंत्रणांनी लक्ष केंद्रित केले आहे.

Advertisement

एसआयटी पाठोपाठ आता ईडीचा दणका

खरात प्रकरणात आर्थिक अफरातफरीचे आरोप झाल्यानंतर विरोधकांनी चाकणकर यांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी केली होती. विशेष तपास पथकाने (SIT) खरातची दीड महिना चौकशी केल्यानंतर चाकणकर यांना चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, आता थेट ईडीने समन्स बजावल्याने चाकणकर यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

प्रकरणाची पार्श्वभूमी

अशोक खरातने नाशिकमध्ये श्रीमंत भक्तांना भुलवून लाखो रुपये उकळले असून, अनेक महिलांच्या शोषणाचे आरोप त्याच्यावर आहेत. खरातच्या कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने हे सत्य उघड केल्यानंतर चाकणकर यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. सुरुवातीला खरातशी संबंध नाकारणाऱ्या चाकणकर यांचा 'पाय आता खोलात' गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

https://www.facebook.com/share/p/17mBDZ1Wep/

Comments

No comments yet.