पुणे, (विशेष प्रतिनिधी) १३ मे - देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या 'नीट' (NEET) पेपरफुटी प्रकरणात आता मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात १६ संशयितांना अटक करण्यात आली असून, अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरीचा रहिवासी असलेल्या धनंजय लोखंडे याला विशेष पथकाने ताब्यात घेतले आहे. तसेच, विद्यार्थ्यांना या साखळीपर्यंत पोहोचवण्याचे काम करणाऱ्या मनीषा वाघमारे या महिलेलाही पुणे पोलिसांनी अटक केली आहे.
राहुरीतून धनंजय लोखंडे ताब्यात
मूळचा राहुरी तालुक्यातील असून सध्या पुणे जिल्ह्यातील वाघोली येथे राहणाऱ्या धनंजय लोखंडे याला विशेष पथकाने ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मंगळवारी (दि. १२) सीबीआय (CBI) पथकाने राहुरीतील महाडिक सेंटर या त्याच्या मूळ गावी जाऊन चौकशी केली होती. या तपासाचा संशय नाशिकच्या शुभम खैरनारपर्यंतही असून, प्रश्नपत्रिका नाशिकमधून गुरुग्राम, जयपूर आणि देशभर पसरवल्याचा संशय यंत्रणांना आहे.
पुण्यात ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलेचा सहभाग
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आज पहाटे मनीषा वाघमारे या महिलेला ताब्यात घेतले आहे. मनीषा ही पुण्यात ब्युटी पार्लर चालवते. तिच्यावरील आरोपांचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे:
मध्यस्थाची भूमिका: विद्यार्थ्यांना आरोपी धनंजय लोखंडेपर्यंत पोहोचवण्याचे काम मनीषा करत असल्याचा संशय आहे.
पुरावे जप्त: पोलिसांनी मनीषाकडून लॅपटॉप आणि मोबाईल जप्त केला असून, त्यात धनंजयसोबतचे व्हॉट्सॲप कॉल्स आणि मेसेजेस सापडले आहेत.
सीबीआयकडे ताबा: मनीषा वाघमारे हिला आज सायंकाळपर्यंत सीबीआयच्या ताब्यात दिले जाण्याची शक्यता आहे.
तपासाची चक्रे वेगवान
राजस्थान पोलीस नाशिकच्या शुभम खैरनारचा शोध घेत असतानाच, अहिल्यानगर आणि पुण्यातून झालेल्या या अटकेमुळे पेपरफुटीची मोठी साखळी उघड होण्याची शक्यता आहे. धनंजयला राहुरीतून ताब्यात घेतल्याचे पोलीस अधिकृतरीत्या सांगत नसले, तरी सीबीआयच्या सक्रियतेमुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.