कुंभमेळ्याच्या 'बोधचिन्हा'चे थाटात अनावरण... यांनी पटकावले ३ लाखांचे बक्षीस...

Share:
Main Image
Last updated: 13-May-2026

मुंबई, (विशेष प्रतिनिधी) १३ मे - नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अधिकृत बोधचिन्हाचे (लोगो) अनावरण आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते या पवित्र बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. देशव्यापी स्पर्धेतून निवडलेले हे बोधचिन्ह नाशिकचा धार्मिक वारसा आणि गोदावरीचे महत्त्व अधोरेखित करणारे आहे.

देशभरातून ३ हजार प्रवेशिका; सुमित काटे ठरले मानकरी
कुंभमेळा प्राधिकरणाने 'मायगव्ह' आणि 'असोसिएशन ऑफ डिझाइनर्स ऑफ इंडिया'च्या सहकार्याने या लोगोसाठी एक स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत ७० आंतरराष्ट्रीय स्पर्धकांसह एकूण ३,०६७ प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या.
प्रथम क्रमांक: पुणे येथील सुमित काटे यांनी प्रथम क्रमांक पटकावला असून, त्यांना ३ लाख रुपयांचे बक्षीस व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
द्वितीय क्रमांक: नोएडा येथील मयांक नायक (२ लाख रुपये).
तृतीय क्रमांक: पंढरपूर येथील पीयुष पिंपळनेरकर (१ लाख रुपये).
या निवडीसाठी प्रसून जोशी आणि अश्विनी देशपांडे यांच्यासारख्या दिग्गज तज्ज्ञांच्या समितीने परीक्षण केले होते.

काय आहे बोधचिन्हाचे वैशिष्ट्य?
हे बोधचिन्ह नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या धार्मिक परंपरेवर आधारित असून त्यात अनेक आध्यात्मिक प्रतीकांचा संगम आहे:
भगवान शंकराचे त्रिशूळ: हे आध्यात्मिक उर्जेचे प्रतीक म्हणून दर्शवले आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिर: प्रादेशिक वारशाचे दर्शन घडवणारी मंदिराची प्रतिकृती यात आहे.
गोदावरी नदी व शिवलिंग: गोदावरी नदीला 'शिवलिंगा'च्या रूपात रेखाटण्यात आले असून, काळाराम मंदिराची कमानही यात दिसून येते. हे कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाचे महत्त्व अधोरेखित करते.

Advertisement

साधू-संतांच्या उपस्थितीत सोहळा

या कार्यक्रमाला कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, छगन भुजबळ, दादाजी भुसे यांच्यासह विविध आखाड्यांचे साधू-संत मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी साधू-संतांचे स्वागत केले. कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी आणि पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी शासन कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

?s=20

Comments

No comments yet.