संत सावता महाराज, महात्मा बसवेश्वर आणि संत चोखामेळा यांचे स्मारक होणार... असे आहे सरकारचे नियोजन...

Share:
Main Image
Last updated: 12-May-2026

सोलापूर, (प्रतिनिधी) १२ मे - "अरण येथील संत शिरोमणी श्री सावता महाराज यांच्या स्मारकासाठी राज्य शासनाने १५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, त्यातील ८९ कोटींच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. प्रशासनाने आता विलंब न लावता तातडीने टेंडर प्रक्रिया सुरू करावी आणि मंदिराचे डिझाइन पुढील आठ दिवसांत अंतिम करावे," असे निर्देश सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.

सोलापूर येथील नियोजन भवन येथे आयोजित संत शिरोमणी श्री सावता महाराज, जगद्गुरु महात्मा बसवेश्वर आणि संत चोखामेळा स्मारक आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार समाधान आवताडे आणि जिल्हाधिकारी कार्तिकियेन एस. यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सावता महाराज मंदिराच्या डिझाइनबाबत तडजोड नको

पालकमंत्री गोरे म्हणाले की, सावता महाराज मंदिरासाठी आवश्यक जागा खरेदी करण्यासाठी शासनाकडून १० कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. ही खरेदी प्रक्रिया तात्काळ पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी. "येथे मंदिर हा मुख्य विषय असून त्याचे डिझाइन अतिशय सुंदर, आकर्षक आणि भव्य असावे. यामध्ये कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही," असेही त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

बसवेश्वर आणि चोखामेळा स्मारकांना गती

महात्मा बसवेश्वर स्मारक: मंगळवेढा येथे नियोजित या स्मारकासाठी प्रशासनाकडून १५ एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या जागेवर भव्य स्मारक आणि तलाव सुशोभीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने आवश्यक निधीचा प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

संत चोखामेळा स्मारक: मंगळवेढा शहरात संत चोखामेळा स्मारकासाठी किमान २ एकर पेक्षा अधिक जागा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि स्थानिक आमदारांनी स्वतः प्रत्यक्ष जागेची पाहणी करावी, असे आदेश पालकमंत्र्यांनी दिले.

या निर्णयामुळे सोलापूर जिल्ह्यातील भक्ती आणि शक्तीच्या केंद्रस्थानी असलेल्या या महापुरुषांच्या स्मारकांचा मार्ग मोकळा झाला असून, कामाला आता वेग येणार आहे.

?s=20

Comments

No comments yet.